मुंबई : एम पश्चिम विभागाअंतर्गत येणाऱ्या चेंबूर परिसरात दोन महिन्यांपूर्वी करोनाचे रुग्ण आढळून येत होते. यातील बहुतांश रुग्णांवर याच परिसरात असलेल्या माँ रुग्णालयात उपचार सुरू होते. या सर्व रुग्णांनी करोनावर मात केल्याने माँ रुग्णालय करोनामुक्त झाले असून पुन्हा हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे.

वरळी आणि धारावीनंतर चेंबूरमध्येही करोनाचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून आले होते. चेंबूरमधील टिळक नगर, पेस्तम सागर, सिद्धार्थ कॉलनी, लाल डोंगर, विजय नगर, कोकण नगर, माहुल गाव, वाशीनाका या परिसरात रोज मोठय़ा संख्येने करोनाचे रुग्ण आढळून येत होते. तर चेंबूरमधील पीएल लोखंडे मार्गावर सर्वाधिक – ३०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले होते. दिवसेंदिवस एम पश्चिम विभागात रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिकेने चेंबूर परिसरात असलेल्या माँ रुग्णालयातदेखील ७ एप्रिलपासून ५० खाटांचे करोना केंद्र सुरू केले.

या रुग्णालयात आलेला रुग्ण हा करोनामुक्त होऊनच बाहेर जायला हवा, असा निश्चय माँ रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी संजय डोळस आणि कर्मचाऱ्यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी रुग्णांवर योग्य उपचार केल्याने याठिकाणी दाखल झालेल्या १०२ रुग्णांपैकी एकही रुग्ण दगावला नाही. याठिकाणी दर तासाला रुग्णाची प्राणवायूची मात्रा तपासली जात असे. जर रुग्णाला कृत्रिम श्वसन यंत्रणेची गरज वाटल्यास आम्ही त्याला तात्काळ कुर्ला भाभा रुग्णालयात पाठवत होतो. या दरम्यान आमचे चार डॉक्टर आणि चार कर्मचाऱ्यांनादेखील करोनाची बाधा झाली होती. मात्र त्यांनीदेखील यावर मात केल्याची माहिती डॉ. संजय डोळस यांनी दिली.

सर्वसामान्य रुग्णांकरिता खुले

माँ रुग्णालय हे चेंबूर परिसरातील पालिकेचे एकमेव रुग्णालय आहे. करोनाची साथ येण्यापूर्वी  रुग्णालयात रोज ६०० ते ७०० रुग्ण तपासणीसाठी येत होते. मात्र या रुग्णालयात करोनावरदेखील उपचार सुरू करण्यात आल्याने इतर रुग्णांनी पाठ फिरवली होती. मात्र ६ ऑगस्टपासून हे रुग्णालय करोनामुक्त झाले असून पुन्हा हे रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांसाठी खुले करण्यात आले आहे.