बडा बिल्डर आणि वजनदार वास्तुविशारदापुढे ठाणे महापालिकेच्या शहरविकास विभाग कसा लोटांगण घालतो, हे आता उघड होत असून पोलिसांच्या विनंतीला तब्बल तीन महिने उलटूनही कळव्यातील ‘अप्पर क्रस्ट’ गृहसंकुलाची सविस्तर माहिती महापालिकेने सादर केलेली नाही. यामुळे पालिका अधिकारी आणि बिल्डर लॉबीच्या अभद्र युतीच्या जोरावर ठाणे महापालिकेनेही पोलिसांनाही ठेंगा दाखविण्यापर्यंत मजल मारल्याचे उघड झाले आहे.
करारपत्रात नमूद जागेपेक्षा २० ते ८० चौरस फूट कमी आकाराची घरे दिल्याची रहिवाशांची तक्रार आहे. त्यामुळे या गृहसंकुलाची बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र देताना झालेले प्रत्यक्ष बांधकाम याचा तपशील देण्यास कळवा पोलिसांनी महापालिकेस सांगितले होते. या गोष्टीला तीन महिने उलटूनही शहरविकास विभागाने पोलिसांना अहवाल दिलेला नाही. निवडणुकीच्या कामामुळे या विभागाला वेळ मिळाला नसावा, असा अजब खुलासा महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला.
पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बिल्डर विवेक मंगला, वास्तुविशारद प्रवीण जाधव आणि महापालिकेविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे स्पष्ट करणारा अहवाल सादर करावा, अशी विनंती कळवा पोलिसांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात महापालिकेच्या शहरविकास विभागाकडे केली होती.

आयुक्तांची वकिली!
आयुक्त असीम गुप्ता यांनी या प्रकरणी बिल्डर वा वास्तुविशारदावरील आरोपांबाबत सौम्य भूमिका घेतली. इतकेच नव्हे तर महापालिकेने मंजूर केलेल्या नकाशांपेक्षा बिल्डरने करारात दाखविलेले क्षेत्रफळ जास्त असू शकते, असा बिल्डरधार्जिणा दावाही केला. रहिवासी आणि बिल्डरच्या गैरसमजातून हा प्रकार घडला असावा, अशी दुसरी शक्यताही त्यांनी मांडली. पालिका अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का, या शक्यतेची पडताळणी सुरू आहे. तसे झाले असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असे ते म्हणाले.