पश्चिम रेल्वेचे स्पष्टीकरण, मध्य रेल्वे अनभिज्ञ

मुंबई: अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी धावणाऱ्या लोकल रेल्वेतून पालिका शाळांतील शिक्षक, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही प्रवासास मुभा असल्याचे स्पष्टीकरण पश्चिम रेल्वेने शुक्रवारी केले. त्याचबरोबर शासकीय आणि खासगी रुग्णालयांतील प्रयोगशाळा कर्मचारी, एसटी कर्मचारी यांनाही लोकल प्रवासास परवानगी असेल.

दरम्यान, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी मात्र सरकारच्या निर्देशानुसारच मध्य रेल्वेवरील लोकलमधून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवासाची अनुमती दिली जात असल्याचे सांगितले. पश्चिम रेल्वेने काय निर्णय घेतला ते माहीत नाही, असेही ते म्हणाले.

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उपनगरीय लोकल सुरू के ल्या आहेत. मात्र अत्यावश्यक कर्मचारी कोण यावरून गोंधळ सुरू आहे.

पश्चिम रेल्वेने काढलेल्या नवीन आदेशात आता जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, पालिका शाळेतील शिक्षक आणि पालिके चे कंत्राटी कर्मचारी यांनाही प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने पॅथॉलॉजी कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी दिल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.

मोफत बेस्ट प्रवास बंद

मुंबई: टाळेबंदीत अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीचा मोफत प्रवास बंद करण्याचा निर्णय बेस्ट उपक्र माने घेतला. या कर्मचाऱ्यांसाठी ६०० विशेष बस चालविल्या जात होत्या. येत्या आठवडय़ात या गाडय़ा टप्प्याटप्याने बंद के ल्या जातील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना तिकीटाचे पैसे द्यावे लागतील. पश्चिम आणि मध्य रेल्वेवर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू झाल्याने बेस्टने ही सेवा बंद करण्याचे ठरविले आहे.