News Flash

हत्या संपत्तीच्या वादातून?

शीना बोरा हिची हत्या संपत्तीच्या वादातूनच झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

| August 30, 2015 04:38 am

शीना बोरा हिची हत्या संपत्तीच्या वादातूनच झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे शीनापाठोपाठ तिचा भाऊ मिखाइल याच्याही खुनाचा कट रचण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, हत्येसाठी वापरलेली कार शनिवारी पोलिसांना मिळाली असून ती लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे. हत्येतील आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि मिखाइल यांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
अटकेतील आरोपी इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलीस तपासात मदत करण्याऐवजी आरोपी इंद्राणी मुखर्जी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

इंद्राणी, संजीव एकाच हॉटेलात होते!
हत्येमागचा उद्देश पुराव्यानंतरच स्पष्ट होईल, असे सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले. मालमत्तेचा वाद हेच कारण समोर असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या हत्याकांडासाठी वापरलेल्या गाडीचा पोलिसांनी शोध घेतला असून लवकरच ती ताब्यात घेतली जाणार आहे. हत्येच्या आदल्या दिवशी संजीव खन्ना वरळीच्या हिल टॉप हॉटेलमध्ये उतरला होता. हत्येनंतर इंद्राणी हीसुद्धा हिल टॉप हॉटेलात संजीवसोबत राहिली होती. पोलिसांनी त्या हॉटेलात या दोघांच्या नावाची नोंद असलेली डायरी जप्त केली आहे. आरोपींचा गुन्हय़ातील सहभाग स्पष्ट करण्यासाठी त्यांचे तीन वर्षांपूर्वीचे केलेल्या कॉल्सचे तपशील (सीडीआर) काढले जाणार आहे. शीनाच्या मित्र-मैत्रिणींचेही जबाब नोंदवले जाणार आहेत. इंद्राणी आणि मिखाइलच्या रक्ताचे नमुने घेऊन ते डीएनए चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. मिळालेल्या कवटीवरून शीनाचा चेहरा जुळविण्याचा प्रयत्न न्यायवैद्यक प्रयोगशाळेत केला जाणार आहे. लवकरच सर्व आरोपींना पेणच्या गादोदे गावातील जंगलात नेऊन घटनाक्रम उलगडवला जाणार आहे. संजीव खन्नाचा प्रत्यक्ष हत्या करण्यात सहभाग होता. चालत्या गाडीतच शीनाची हत्या करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2015 4:38 am

Web Title: murder due to property matter
टॅग : Property
Next Stories
1 शीना हत्या : आरोपींची आमनेसामने चौकशी
2 हत्येपूर्वी इंद्राणीकडून पेण परिसराची पाहणी
3 शीनाचे पारपत्र पोलिसांच्या हाती
Just Now!
X