हर्षद कशाळकर harshad.kashalkar@expressindia.com

पत्नीला फोन करून सतत त्रास देणाऱ्या विकृताचा काटा काढण्याचा निर्णय त्याने घेतला. कर्जत येथे बोलावून त्याचा कायमचा बंदोबस्त केला. कुठलाही पुरावा मागे नाही याची दक्षता घेतली. मृतदेह निर्जनस्थळी टाकून दिला; पण पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली आणि त्याला गाठलेच..

Pune, police constable bitten,
पुणे : चोरट्याने घेतला पोलीस शिपायाचा चावा
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

१८ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कर्जत पोलीस स्टेशनचा फोन वाजला.. रेल्वेच्या हद्दीतील रेती गोडाऊनजवळ एक अनोळखी मृतदेह आहे. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहावर तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येऊन तांत्रिक बाबींची पूर्तता करून अज्ञात इसमाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या निर्घृण हत्येमुळे कर्जत परिसरात दहशतीचे वातावरण होते. पोलिसांसमोर गुन्ह्य़ाची उकल करण्याचे आव्हान होते. मृतदेहाची ओळख पटवणे आणि गुन्ह्य़ातील आरोपी निष्पन्न करणे असे दोन पातळ्यांवर पोलिसांनी काम सुरू केले. गुन्ह्य़ाचे गंभीर स्वरूप लक्षात घेत पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे निर्देश दिले. अप्पर पोलीस अधीक्षक संजय गुंजाळ यांना कर्जत पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग यांच्या तपासावर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

पोलीस यंत्रणा कामाला लागली, पण मृतदेहाची ओळख पटविणे मोठे आव्हान होते. कारण मयत व्यक्ती ही स्थानिक नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. त्यामुळे तपासाचा गुंता अधिकच वाढला होता. मग आसपासच्या परिसरांतून कोणी बेपत्ता आहे का याचीही चाचपणी करण्यात आली, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. मृतदेहाची ओळख पटावी यासाठी घटनास्थळ पिंजून काढण्यात आले, मात्र काही सुगावा लागत नव्हता. त्यामुळे गुन्ह्य़ाची उकल करण्यात अडचणी येत होत्या.

अशातच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला एक दुवा हाती लागला. मयताचे नाव झरुद्दीन बशीर बक्ष असे असून तो मूळचा खरवा मध्य प्रदेश येथील रहिवासी असल्याचे समोर आले. तो नाशिक येथून बेपत्ता होता. मयताच्या नातेवाईकांशी संपर्क साधून गुन्ह्य़ाच्या अनुषंगाने माहिती संकलित करण्यात आली. मिळालेली माहिती आणि तांत्रिक पुरावे यांची सांगड घालत तपासाला गती मिळाली.

तपासादरम्यान मिळालेली वस्तुनिष्ठ माहिती तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने गुन्ह्य़ातील संशयितापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. खालापूर तालुक्यातील मोहपाडा येथून ताज अमल उमर अन्सारी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्याने या घटनेशी संबंध नसल्याचा कांगावा केला. मात्र पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने आपल्या काळ्या कृत्याची कबुली दिली.

झरुद्दीन आणि ताज हे मध्य प्रदेशमधील एकाच गावातील रहिवासी होते. दोघेही एकमेकांना ओळखत होते; पण झरुद्दीन हा ताज याच्या पत्नीला वेगवेगळ्या नंबरवरून सतत फोन करून त्रास देत होता. हा प्रकार तिने ताज याला सांगितला होता. यामुळे संतापलेल्या ताजने झरुद्दीन याचा काटा काढण्याचे ठरविले. त्याला नाशिकवरून कर्जत येथे भेटण्यासाठी बोलावून घेतले. १७ नोव्हेंबरला झरुद्दीन कर्जत येथे आला. त्याला पुढील धोक्याची पुसटशी कल्पना नव्हती; पण संतापलेल्या ताजने झरुद्दीन याला निर्जन ठिकाणी नेले तिथे त्याची तीक्ष्ण दगडाने हत्या केली.

हे कृत्य करताना ठोस पुरावा मागे राहणार नाही याची दक्षता ताजने घेतली होती; पण पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून त्याला गाठलेच. अतिशय त्रोटक माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पोलिसांनी या गुन्ह्य़ाची उकल केली.

तपासात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख जे. ए. शेख, साहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस हवालदार एस. एस. हंबीर, एस. पी. शेवते, कराळे, सावंत, शेलार, चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची ठरली.