धकाधकीच्या जीवनात वस्तुसंग्रहालयाला भेट देण्यास वेळ मिळत नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने ‘म्युझियम ऑन व्हील’ उपक्रम राबवत थेट खासगी शाळा, नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आता वस्तुसंग्रहालयाचे हे ‘म्युझियम ऑन व्हील’ लवकरच पालिका शाळांमध्ये दाखल होणार असून पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना बसगाडीमधील वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयास भेट देणाऱ्यांची संख्या तुलनेत कमी असल्याने वस्तुसंग्रहालयच नागरिकांच्या दारी पोहोचविण्यासाठी आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी मोठय़ा वातानुकूलित बसमध्ये विविध वस्तूंसाठी काचेच्या पेटय़ा, माहिती संच, कलाकृती, दृक्श्राव्य साधने, डिजिटल टॅबलेट्स आदी उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. एखाद्या विषयाचे प्रदर्शन या बसमध्ये मांडण्यात येते आणि त्या विषयाशी निगडित बाबी बसमध्ये उपलब्ध केल्या जातात.

प्रदर्शनाची माहिती तज्ज्ञ मंडळींद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितली जाते. यामुळे खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध विषयांची आधुनिक पद्धतीने माहिती मिळू लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनाही ‘म्युझियम ऑन व्हील’ उपक्रमाद्वारे माहिती देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक आणि सेंट झेविअर्स महाविद्यालयातील प्राध्यापक अवकाश जाधव यांनी केली होती.

हा उपक्रम पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याचा विचार शिक्षण विभागातील अधिकारी करीत आहेत. त्यामुळे लवकरच पालिका शाळांतील विद्यार्थ्यांपर्यंत ‘म्युझियम ऑन व्हील’ पोहोचणार असून विविध विषयांची माहिती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना एक नवे दालन खुले होणार आहे.