शरीराने अधू असतानाही आयुष्यात काही करू पाहणाऱ्या व्यक्तींचे समाजाकडून अनेकदा कौतुक होते, मात्र या व्यक्तींमागे शांत आणि ठामपणे उभ्या असलेल्या जोडीदार, पालकांचे कर्तृत्व अनेकदा नजरेआड होते. समाजातील अशा आधारवडांचे कौतुक करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सलाम सेवेला या हृदय सोहळ्यातील आपलेपणा पाहून अनेकांना अश्रू आवरले नाहीत. शनिवारी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रामध्ये कौतुकाचा सांगीतिक सोहळा मराठी कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला.
कुल्र्याच्या कचरा डेपोमध्ये कचरा वेचण्याचे काम करून कुटुंबाचे पोट भरणारी मंदा गायकवाड गेली १८ वर्षे आपल्या अपंग मुलाचा सांभाळ करीत आहेत. पहिला मुलगा पायाने अपंग असल्याचे कळल्यावरही त्या घाबरल्या नाहीत. कचरा डेपोत काम करून मुलाच्या औषधांचा खर्च भागवत होत्या.
मुलानंतर झालेली मुलगीही अपंग असल्याचे कळले तेव्हा त्यांना आवरणे कठीण होते, मात्र या आव्हानांना डगमगून न जाता जिद्दीने त्या मुलांना वाढवत आहे.
अशा अनेक वास्तव कथांमध्ये साहाय्यकाचे काम करत स्वत:चे आयुष्य मुलांसाठी वेचणारे पालक शनिवारी एकत्र जमले होते. कुठलीची तक्रार न करता, मौजमजा बाजूला ठेवून, तर काही वेळा करिअर बाजूला ठेवून मुलांना वाढवणाऱ्या या पालकांना ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी ‘सलाम सेवेला’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कौतुकाची सलामी दिली.
या वेळी उच्च न्यायालय सत्यरंजन धर्माधिकारी, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, जिल्हाधिकारी (शहरे) अश्विनी जोशी या मान्यवरांनी मतिमंद आणि अपंग मुलांसाठी काम करणाऱ्या जागृती आणि एफपीएच या संस्थांचा सत्कार केला. तर करुणामय अंत:करणाचा पुरस्कार वरळी येथील एफपीएच संस्थेला देण्यात आला. या वेळी मकरंद अनासपुरे, सुकन्या कुलकर्णी, स्पृहा जोशी, उमेश कामत, प्रसाद ओक, आशालता, नंदिता धुरी, संपदा जोगळेकर, आदिती सारंगधर, किशोरी आंबिये, राजन भिसे असे दिग्गज कलाकार उपस्थित होते. यांनी या पालकांचा सत्कार तर केलाच, त्याचबरोबर प्रेमाने जेवणही वाढले. अपंग आणि मतिमंद मुलांचा सांभाळ करताना अधिक काळजी घ्यावी लागते. त्यांना सांभाळण्यात आम्ही स्वत:चे आयुष्य विसरून जातो, मात्र मुळ्ये काकांनी आमचा सत्कार करून त्याची दखल घेतली.
यातून आम्हाला काम करण्यासाठी अधिक बळ मिळाले असल्याची भावना या वेळी उपस्थित पालकांनी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी खूप मेहनत केली आहे.
अपंग, भिन्नमती मुलांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या पालकांचे धैर्य मोलाचे आहे. स्वत:च्या इच्छा-आकांक्षा विसरून हे पालक मुलांसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची करतात. यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला सलाम देण्यासाठी या कार्यक्रमाची आखणी केली असल्याचे अशोक मुळ्ये यांनी सांगितले.
हा कार्यक्रम अतिशय स्त्युत्य आहे. मुळ्ये काका नेहमीच अशा संकल्पना लोकांसाठी राबवत असतात. ‘सलाम सेवेला’ या कार्यक्रमामुळे आयुष्यभर निरलसपणे पालकत्वाची भूमिका बजावणाऱ्या पालकांना विसाव्याचे क्षण अनुभवता आले, अशी भावुक प्रतिक्रिया अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली.