राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावरील सध्या अस्तित्वात असलेली व पुढे बांधण्यात येणारी सर्व शासकीय वसतिगृहे मातोश्री नावाने ओळखली जातील. वसतिगृहांच्या नामकरणाचा हा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली उच्च शिक्षण संचालनालय, तंत्र शिक्षण संचालनालय, कला संचालनालय व अकृषी विद्यापीठांच्या अखत्यारीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे आहेत. शासकीय वसतिगृहे आधार, आपुलकी व स्नेहभाव निर्माण करणारी आधारगृहे असावीत. या उद्देशाने मातोश्री वसतिगृहे असे संबोधने सयुक्तिक ठरेल, असे विभागाचे मत आहे. त्यानुसार  नामकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्याला आता मान्यता देण्यात आली.

राज्यातील सध्या अस्तित्वात असलेली व कोणत्याही विशिष्ट नावाने संबोधण्यात न येणाऱ्या मुलामुलींच्या वसतिगृहांना तसेच यापुढे बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहांना मातोश्री शासकीय वसतिगृहे असे नाव देण्यात येईल, असा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. या विभागाने मंगळवारी तसा शासन आदेश काढला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने उच्च शिक्षण संचालनालय, तंत्र शिक्षण संचालनालय, कला संचालनालय, तसेच अकृषी विद्यापीठांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

निर्णयामागील विचार

शासकीय वसतिगृहे केवळ भिंतीचा निवारा न राहता मुलामुलींसाठी आधार, आपुलकी व स्नेहभाव निर्माण करणारी आधारगृहे असावीत. आपल्या कुटुंबांपासून दूर वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींच्या मनात हा भाव रुजावा, या उद्देशाने मातोश्री वसतिगृहे असे संबोधने सयुक्तिक ठरेल, असे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मत आहे.