शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आपली कुचंबणा झाल्याचा दावा करून दोन्ही पक्षांना रामराम ठोकणाऱ्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपने पक्षात अधिकृतपणे प्रवेश देण्याचे तर टाळलेच पण त्याचबरोबर विधान परिषदेची उमेदवारी नाकारून मोठा झटका दिला आहे. भविष्यात आपले राजकीय पुनर्वसन होईल या आशेवर राणे असले तरी त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शिवसेनेने राणे यांना मुख्यमंत्रिपद भूषविण्याची संधी दिली. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्याकडे निर्णय प्रक्रियेचे अधिकार आल्यापासून उद्धव आणि राणे यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यातूनच राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर राणे यांचा तात्काळ मंत्रिमंडळात समावेश करून त्यांच्याकडे महसूल हे महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले होते. मुख्यमंत्रिपद नाकारल्यानंतर राणे यांनी राहुल गांधी आणि अहमद पटेल यांच्यावर आरोप केले होते. पक्षाने त्यांना निलंबित केले. तरीही राणे यांची उपयुक्तता लक्षात घेता त्यांना काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश देण्यात आला आणि मंत्रिपदही सोपविण्यात आले. विधानसभा निवडणुकीत लागोपाठ दोन पराभव होऊनही गेल्या वर्षी काँग्रेसने राणे यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. काँग्रेसने कायमच राणे यांचा सन्मान केला होता, अशी प्रतिक्रिया राज्याचे काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी मागे व्यक्त केली होती.

राणे यांची वेळ चुकली?

शिवसेनेला शह देण्याकरिता नारायण राणे हे उपयुक्त ठरतील असे भाजपचे गणित होते. निवडणुकीच्या तोंडावर त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचे घाटत होते. पण सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बरखास्त केल्याने राणे यांनी संतप्त होऊन काँग्रेसचा राजीनामा दिला. राणे यांनी काँग्रेस सोडण्याची घाई केली, अशी भाजपमध्ये प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपने राणे यांना पक्षात प्रवेश दिला नाही. याउलट स्वतंत्र पक्ष स्थापन करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्याचा सल्ला भाजपने राणे यांना दिला होता. राणे यांच्यासाठी हा पहिला धक्का होता. मंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आले. अनेक मुहूर्त निघाले, पण राणे यांचा मंत्रिमंडळ प्रवेशही लांबला. आता तर भाजपने विधान परिषदही देण्याचे टाळले आहे.

शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आपली कुंचबणा झाली, असा राणे हे नेहमी आरोप करतात. भाजपमध्येही काही वेगळे झालेले नाही. सध्या तरी थांबा आणि वाट पाहा हे राणे यांना निमूटपणे सहन करावे लागणार आहे.