काँग्रेस नेतृत्वाची बदनामी वा काही आरोप झाल्यास पक्षाकडून निषेधापलीकडे फार काही केले जात नाही. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादंगावरून भाजप किंवा संघ परिवाराकडून राहुल गांधी यांना लक्ष्य केले जात असल्याच्या पाश्र्वभूमीवर भाजपला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिल्याने त्यांच्यातील जुना ‘शिवसैनिक’ जागा झाल्याचे बघायला मिळाले.
राहुल गांधी यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे गंभीर विधान भाजपच्या एका आमदाराने केले आहे. भाजप, संघ परिवार किंवा अभाविपकडून राहुल यांच्या बदनामीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या देशभक्तीबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे हे असेच सुरू राहिल्यास काँग्रेसचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारण्याच्या भानगडीत पडू नये, असा इशाराही राणे यांनी पत्रकार परिषदेत भाजपला दिला.