शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यावर जाऊ नका. मागील दोन-चार वर्षांतील त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्या. त्यांनी दिलेला एकही शब्द पाळलेला नाही. शिवसेना बोलेन तसा वागणारा पक्ष नसल्याची टीका राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. नीतिमत्ता नसलेला पक्ष अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे. बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना अशी नव्हती, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

हेही वाचा..जनता नव्हेतर ‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी युती, नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार

शिवसेना आणि जनहित हे रूचतच नाही. टक्केवारीवर चालणारी ही मंडळी आहेत असे म्हणत महापालिकेतील कामे कोण घेतो असा सवाल त्यांनी केला. हे फसवणूक करणारे लोक आहेत. शिवसेना जनतेसाठी काही करू शकत नाही. मुंबईत मराठी लोकांची टक्केवारी का कमी झाली, यावर उद्धव ठाकरे का बोलत नाहीत. मुंबईतील मराठी माणूस कमी होण्यास शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. बांधकामाचे प्लॅन ते कसे संमत करतात. मराठी माणसाला ५०० चौ.फूट जागा देण्याची अट त्यांनी का घातली नाही?

मागच्या साडेचार वर्षांत त्यांनी जनहित काय साध्य केले. जिथे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची ताकद आहे. तिथे आम्ही शिवसेना निवडून येऊ नये, असा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. सत्तेत असूनही उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी आणि नाणार प्रकल्पासाठी काहीही करू शकले नसल्याचे ते म्हणाले.

युती होणार नाही म्हणून संजय राऊत एवढे बोलत होते. काय झाले आता.. संजय राऊत यांनी स्वत:ची फजिती करून घेतल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.