शिवसेना थांबा आणि वाट पाहाच्या भूमिकेत; जुळवून घेतल्यानंतरही भाजपची शिवसेनेच्या मतदारसंघातही जनसंपर्क मोहीम

ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यांचाही विरोध असून शिवसेना ‘थांबा आणि वाट पाहा’च्या भूमिकेत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बंधुप्रेमाचे सूर जमवून स्नेहभोजन घेतले असले तरी आगामी २०१९च्या निवडणुकीसाठी राज्यात शिवसेनेच्याही मतदारसंघात निवडणूक तयारी व जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे.

काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या राणे यांनी भाजप प्रवेशासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे त्यासाठी अनुकूल आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच त्यांच्या सहकारी ज्येष्ठ मंत्र्यांचाही भाजप प्रवेशाला विरोध आहे. राज्य मंत्रिमंडळात राणे यांना स्थान दिल्यास किंवा पक्षातही घेतल्यास त्यांचा बेधडक स्वभाव आणि बिनधास्त बोलण्याची सवय यामुळे ज्येष्ठ मंत्र्यांनाही त्रास होऊ शकतो. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत काही ज्येष्ठ मंत्र्यांची नुकतीच बैठक झाली. राणे यांना पक्षात घेतल्यास काय प्रतिक्रिया उमटतील, याचा अंदाज मुखमंत्री फडणवीस यांनी घेतला आहे व त्याची कल्पना पक्षश्रेष्ठींना दिली आहे.

पण शिवसेनेला लगाम घालून नियंत्रणात ठेवायचे असल्याने त्यासाठी राणे उपयुक्त असल्याचे भाजपच्या काही नेत्यांचे मत आहे. शिवसेना भाजपबरोबर किती काळ राहील, याची खात्री नसल्याने शिवसेनेला धडा शिकविण्याची रणनीती आखण्यात येत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेशी सौहार्दाचे सूर जुळविण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी बंधुप्रेमाचा सूर आळविला. पण शिवसेनेचे राज्यात खच्चीकरण करून भाजपचा आणखी विस्तार करण्याची पक्षाची भूमिका आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीत ज्या जागा गमावल्या, त्या मतदारसंघात आणि भाजपच्या मतदारसंघातही देशपातळीवर जनसंपर्क मोहीम राबविण्यासाठी ६ एप्रिलपासून कार्यक्रम सुरू आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रालोआच्या सर्व घटक पक्षांचा पाठिंबा आवश्यक असल्याने त्यांना नाराज करायचे नाही, यासाठी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदारांना पाठविले नाही. मात्र राज्यात प्रदेश पातळीवर सर्व आमदारांसाठी सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क अभियानाअंतर्गत सर्व २८८ मतदारसंघात भाजपने निवडणूक तयारीच्या दृष्टीने कार्यक्रम सुरू ठेवले आहेत.

शिवसेनेचे मौन

राष्ट्रपतीपदाची निवडणूक होईपर्यंत भाजपकडून शिवसेनेशी सौहार्द टिकविण्याचे प्रयत्न होतील व नंतर शिवसेनेचे खच्चीकरण करून भाजपची ताकद राज्यात वाढविण्याची रणनीती आहे, हे शिवसेना ओळखून आहे, असे ज्येष्ठ शिवसेना नेत्याने सांगितले. राणे यांच्यासह अन्य नेत्यांच्या भाजप प्रवेशाकडेही शिवसेना लक्ष ठेवून आहे. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘थांबा आणि वाट पाहा’ हे धोरण ठेवले असल्याने शिवसेना नेते मौन बाळगून आहेत. शिवसेना योग्य वेळी भाजपला प्रत्युत्तर देईल, असे संबंधितांनी स्पष्ट केले.