वांद्रे (पूर्व) येथील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचे आव्हान असूच शकत नाही, त्यांची अनामत रक्कमही जप्त होईल आणि एमआयएमचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहील, असे टीकास्त्र शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सोडले.
   तर या पोटनिवडणुकीत भाजपची लाट संपवून काँग्रेसची विजयाकडे वाटचाल सुरु होईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी नारायण राणे यांना पाठिंबा देत एमआयएमवर टीकेची झोड उठविल्याने ही निवडणूक रंगतदार होऊ लागली आहे.
शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांच्या प्रचारासाठी खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी मतदारसंघात उतरले आहेत. एमआयएमला शिवसेनेचे पिल्लू म्हणणारे नारायण राणे हे काही दिवसांपूर्वी त्यांचे पाय धरीत होते. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे चेंबूर नाक्यावरील ‘कोंबडीचोर’ राणे हे जुहू चौपाटीवर ९ मजल्यांच्या इमारतीत कसे राहतात, असा खोचक सवाल राऊत यांनी विचारला. राणेंकडचा पैसा हा जादूचा की तेलगीचा, अशी टीकाही त्यांनी केली.
राणे यांच्यासाठी काँग्रेसनेही आपली ताकद पणाला लावली असून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासह कृपाशंकर सिंह, नसीम खान व अन्य काँग्रेस नेते मतदारसंघ पिंजून काढत आहेत.