भाषणाच्या ध्वनिचित्रफिती दाखवून ओळख पटवली

मारेकऱ्यांनी हत्येआधी अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर दोनदा पाळत ठेवून संपूर्ण दिनक्रम जाणून घेतला होता. त्याआधी डॉ. दाभोलकर यांच्या भाषणांच्या ध्वनिचित्रफिती आणि छायाचित्रांचा अभ्यास केला होता, अशी माहिती अटकेत असलेल्या आरोपींनी केंद्रीय अन्वेषण विभागाला(सीबीआय) दिली.

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अमोल काळेसह एकूण सहा आरोपींना अटक केली. सहा आरोपींकडे स्वतंत्रपणे चौकशी करून डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा कट, प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि त्यानंतरचे पलायन या संपूर्ण घटनाक्रमाची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न सीबीआयकडून सुरू आहे. अंदुरे, कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा संशय आहे. या दोघांनी हत्येआधी दोन वेळा डॉ. दाभोलकर यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर पाळत ठेवली. नियमितपणे पहाटे वॉकसाठी बाहेर पडलेल्या डॉ. दाभोलकर यांच्या संपूर्ण दिनक्रमावर दोघांनी नजर ठेवली. दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी ओंकारेश्वर पूल हे ठिकाण हत्येसाठी निश्चित केले. हत्येआधी या दोघांना अचूक ओळख पटवता यावी यासाठी डॉ. दाभोलकर यांच्या यूटय़ूबवरील भाषणांच्या ध्वनिचित्रफिती, गुगलवर उपलब्ध छायाचित्रे दाखवण्यात आली, अशी माहिती या चौकशीतून मिळाली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अंदुरे, कळसकर यांच्याव्यतिरिक्त अन्य चौघांची हत्येतील भूमिका, सहभागाबाबत सीबीआयकडून अधिक चौकशी सुरू आहे.