शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ९ जानेवारीपासून राज्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा सुरू करणार असून याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनाच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. भाजप-शिवसेनेत सुरू असलेल्या शह-काटशहाच्या राजकारणात मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे दुष्काळ पाहणीवर निघत असल्याने महाराष्ट्रात बुधवारी मोदी-ठाकरे ‘सामना’ रंगणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची शनिवारी मातोश्रीवर बैठक घेतली. त्यात उद्धव ठाकरे बुधवार ९  जानेवारी २०१९ पासून मराठवाडा-विदर्भातील दुष्काळी भागांचा दौरा करतील, असा निर्णय घेण्यात आला. हा केवळ दौरा नसेल तर शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतही केली जाणार आहे. दुष्काळग्रस्त गावांची पाहणी, तेथील शेतकऱ्यांशी संवाद, दुष्काळग्रस्तांना मदत असे उद्धव यांच्या दौऱ्याचे स्वरूप असेल. पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आदी या बैठकीस उपस्थित होते.

प्रकल्पांचे भूमिपूजन-उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जानेवारीला सोलापुरात येत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या दुष्काळ दौऱ्यासाठी नेमकी मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची तारीख निवडली आहे. मोदी यांचा दौरा आधीच जाहीर झाला होता. त्यामुळे सोलापुरात मोदी केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीचा प्रचार करत असताना मराठवाडय़ातील दौऱ्यातून उद्धव ठाकरे हे दुष्काळग्रस्तांच्या समस्यांद्वारे जनतेच्या असंतोषाला वाचा फोडतील. त्यामुळे ९ जानेवारीला भाजप-शिवसेनेचे दोन सर्वोच्च  नेते महाराष्ट्राच्या रणांगणात  उभे ठाकणार असल्याने हा ‘सामना’ रंगतदार ठरणार आहे.