राज्यात आंदोलन; दिल्लीत पवार-मोदी भेट
दुष्काळाच्या प्रश्नावर राज्यातील भाजप सरकार गंभीर नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाडय़ातील आठ जिल्हय़ांमध्ये आंदोलन करीत शक्तिप्रदर्शन केले, पण त्याच वेळी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळाच्या मुद्दय़ावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादी सत्ताधारी भाजपच्या विरोधात किती गंभीर आहे, याचीच चर्चा सुरू झाली.
संपूर्ण कर्जमाफी, दुष्काळी भागात शेतकऱ्यांना मदत मिळावी आदी मागण्यांकरिता राष्ट्रवादीच्या वतीने मराठवाडय़ातील आठ, तर विदर्भातील बुलढाणा जिल्हय़ात आंदोलन करण्यात आले. नऊ जिल्ह्य़ांमध्ये १०६ ठिकाणी रास्ता रोको, जेल भरो आंदोलन करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांनी आंदोलनाला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचा दावा तटकरे यांनी केला.
दरम्यान, शरद पवार यांच्या आंदोलनाची वेळ चुकली, अशी टीका महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. सध्या पडत असलेल्या पावसाने दुष्काळाची तीव्रता कमी झाल्याचा दावाही खडसे यांनी केला.
पवार-मोदी भेट
भाजप आणि राष्ट्रवादीतील वाढत्या जवळिकीबद्दल नेहमीच चर्चा होते. मराठवाडय़ात पक्षाच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले नेमके तेव्हाच राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दुष्काळावर मात करण्याकरिता केंद्राने पुढाकार घ्यावा म्हणून पवार यांनी मोदी यांची भेट घेतली.
शिवसेनेला सूचक इशारा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका सुरू केली आहे.
नव्याने ई-निविदेवरून त्यांनी मुख्यमंत्री वा भाजपला लक्ष्य केले. भाजप आणि राष्ट्रवादी अधिक जवळ येणे हा शिवसेनेसाठी सूचक इशारा असल्याचे मानले जाते.