|| नमिता धुरी, शलाका सरफरे

नवरात्रीच्या निमित्ताने भोंडल्याच्या परंपरेचे जतन

नवरात्र म्हटले की गुजराती संस्कृतीतून मराठी मातीत रुजलेला रास गरबा आणि दांडियाच तरुण पिढीला आठवतो. पण अस्सल महाराष्ट्रीय परंपरेतला भोंडला आजकाल काहीसा विस्मरणात गेलेला दिसतो. मुंबई-ठाण्यातील काही महिला मंडळे या परंपरेचे जतन करीत आहेत. काही महिला या पारंपरिक खेळातून अर्थार्जनही करीत आहेत.

आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते आणि पुढचे नऊ दिवस देवीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवसांत मुली-महिला संध्याकाळी दिवेलागणीनंतर नटून-थटून, नऊवारी साडी, परकर-पोलके अशा पारंपरिक वेशात एकत्र येतात. मधोमध हत्तीची सजवलेली मूर्ती ठेवली जाते किंवा रांगोळीने हत्तीचे चित्र काढले जाते. काही ठिकाणी मूगडाळ आणि तांदळांच्या साहाय्याने हत्तीची प्रतिकृती काढली जाते. पूर्वी राजे हत्तीवरून फिरत असत. त्यामुळे हत्ती हे ऐश्वर्य आणि संपन्नतेचे प्रतीक मानून त्याची पूजा केली जाते. ही हस्त नक्षत्राचीही पूजा असते. शेतातील पीक अधिक जोमाने तरारून यावे ही त्यामागील भावना असते. खान्देशात हत्तीऐवजी भुलोजी आणि भुलाबाई या नावाने शंकर-पार्वतीची मूर्ती ठेवण्याचीही प्रथा आहे. तिथे या खेळाला भुलाबाई म्हणतात तर विदर्भात हादगा म्हणतात. ‘पूर्वी मुलींचे लग्न अगदी लहान वयात व्हायचे. कुटुंब, संसार आणि घरकामांच्या जबाबदारीतून मुलींना थोडी उसंत मिळावी यासाठी भोंडल्यासारखे खेळ खेळले जात,’ अशी माहिती ‘ब्राह्मण सभे’च्या स्मिता आठवले यांनी दिली. सर्वसामान्य गृहिणींसाठी हा एक प्रकारे अर्थार्जनाचाही मार्ग आहे. ‘भोंडला खेळण्यासाठी काही वेळा आयोजकांकडून महिला गटांना दहा हजारांच्या आसपास मानधनही मिळते,’ अशी माहिती ‘दुर्गेशवरी भोंडला’ गटाच्या जागृती साठय़े यांनी दिली.

सर्व महिला, मुली हत्तीभोवती गोल फेर धरून नाचतात.  ‘फेर धरू गं फेर धरू’, ‘कारल्याचा वेल लाव गं सुने’, ‘ऐलमा-पैलमा गणेश देवा’, ‘एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबू झेलू’ अशी काही ठरावीक पारंपरिक गाणी म्हटली जातात. यासाठी महिला महिनोंमहिने सराव करतात, असे ‘संस्कार भारती’च्या सुधा कर्वे सांगतात.

या गाण्यांत माध्यमातून सासर-माहेरच्या गप्पा, उखाणे यांचा समावेश असतो. नाचून-गाऊन शेवटी भूक लागते. त्याची सोयही आधीच केलेली असते. पण आणलेला खाऊ असा सहजासहजी खाता येत नाही. भोंडला खेळायला आलेल्या प्रत्येक महिलेने आपला पदार्थ झाकून आणलेला असतो. त्याला खिरापत असे म्हणतात.

‘पुरुषांनीही सहभागी व्हावे’

गेली १५ वर्षे स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या माध्यमातून विविध ठिकाणी भोंडला सादर करणाऱ्या कांचन ठाकूर म्हणतात की, ‘नवरात्र म्हणजे गरबा हे समीकरण बदलून भोंडला या पारंपरिक खेळाचा प्रसार झाला पाहिजे. पुरुषांनीही या खेळात सहभागी होऊन त्याचा आनंद घेतला पाहिजे. भोंडला सादर करून आम्ही संस्कृती तर जपतोच पण त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य गृहिणींना थोडाफार रोजगारही मिळतो.’