अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) सहायक दिग्दर्शक हृषीकेश पवार यांना मंगळवारी रात्री अटक केली. सुशांतला अमली पदार्थ पुरविल्याचा आरोप पवार यांच्यावर आहे.

अमली पदार्थामुळे सुशांतचा मृत्यू झाला का? ही शक्यता पुढे आल्यानंतर एनसीबीने या प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास सुरू केला. एनसीबीने सुशांतची प्रेयसी, अभिनेत्री रिया चक्र वर्ती, तिचा भाऊ शोविक, व्यवस्थापक, नोकर, अमली पदार्थ पुरवणारे तस्कर, विक्रेत्यांना अटक केली. या आरोपींच्या चौकशीतून पवार यांचे नाव पुढे आले होते. त्यांना एनसीबीने समन्स बजावून चौकशीकरिता बोलावले. मात्र पवार यांनी चौकशी टाळली. अखेर मंगळवारी त्यांना एनसीबीने ताब्यात घेतले व रात्री उशिरा अटक केली. गेल्या महिन्यात अटक केलेला ब्रिटनचा नागरिक करण सजनानी व दोन तरुणींचाही सुशांत मृत्यू प्रकरणात सहभाग आहे का, याबाबतही तपास सुरू आहे.