संविधान बचाव रॅलीच्या निमित्ताने विरोधकांची एकजूट ; राहुल गांधी यांचेही सहकार्य घेणार

प्रजासत्ताकदिनी काढण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीच्या निमित्ताने भाजप विरोधातील सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यशस्वी झाले. विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करण्याचा पवार यांचा हा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते. विरोधकांच्या प्रभावी आघाडीकरिता २९ तारखेला नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे सहकार्य घेण्यात येणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले आहे.

संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसने शक्तिप्रदर्शन केले. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचूरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा, ज्येष्ठ समाजावादी नेते शरद यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी आदी राष्ट्रीय पातळीवरील नेते सहभागी झाले होते. याशिवाय सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण,  पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे हे राज्य काँग्रेसमधील नेत्यांचा सहभाग होता.

संविधान बचाव रॅलीचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले असले तरी त्यात राष्ट्रवादीचा जास्त सहभाग होता. राष्ट्रीय नेत्यांनी सहभागी व्हावे म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच प्रयत्न केले होते.  राष्ट्रवादीच्या पुढाकाराने ही पदयात्रा निघणार होती. यामुळे राज्यातील काँग्रेस नेते आधी सावध होते. पण सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधल्यावर राज्यातील काँग्रेस नेतेही सहभागी झाले. आधी नागपूरमध्ये हल्लाबोल आंदोलन आणि प्रजासत्ताकदिनी मुंबईतील संविधान बचाव या दोन कार्यक्रमांमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा किंवा पदयात्रेत काँग्रेस सहभागी झाला.  विरोधी आघाडी किंवा तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न यापूर्वीही शरद पवार यांनी केला होता. २००५ मध्ये सूरतमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला सर्व विरोध नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. २००९च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार हेच भावी पंतप्रधान, असा प्रचार राष्ट्रवादीने केला होता.

केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात ग्रामीण भागात वातावरण तयार होऊ लागले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पर्याय कितपत स्वीकारला जाईल याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. अशा वेळी विरोधकांची मोट बांधण्यावर शरद पवार यांनी भर दिला आहे. देशातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी पवारांचे वैयक्तिक संबंध आहेत. त्याचाही त्यांना फायदा होऊ शकतो.

दिल्लीत सोमवारी बैठक

संविधान बचाव रॅलीनंतर भविष्यातील भूमिका व त्या दृष्टीने कोणती पाऊले उचलायची याचा निर्णय घेण्याकरिता २९ तारखेला नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सहकार्याने पुढील गोष्टींचे नियोजन करणार असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले आहे. यावरूव विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करण्याचा पवारांचा प्रयत्न स्पष्ट होतो. अर्थात, राहुल गांधी किंवा काँग्रेस पवारांना कितपत प्रतिसाद देतात यावरही सारे अवलंबून राहिल. काँग्रेस ठराविक मर्यादेच्या पलीकडे पवारांचे नेतृत्व मान्य करण्याची शक्यता कमीच आहे.