राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपा-शिवसेना युतीवरून ‘सामना’त प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखाचा दाखला देत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ‘सामना’मधील आजचा अग्रलेख लता मंगेशकर यांच्या आवाजापेक्षाही गोड आहे, वाचलात का, असा उपरोधिक सवाल मुंडे यांनी विचारला आहे. तलवार म्यानबंद नाही वारा आमच्या दिशेने वळला या मथळ्याखाली ‘सामना’मध्ये अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. त्याचा समाचार मुंडे यांनी घेतला आहे.

सोमवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी युती जाहीर केली. त्यानंतर विरोधी पक्षांसह सोशल मीडियावर युतीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर युती करणार नाही अशी वारंवार भीमगर्जना करणारे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांच्या त्या त्या वेळच्या वक्तव्याचा दाखल दिला जात आहे. शिवसेनेने ‘सामना’तून युतीवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. जनतेच्या मनात कमी, पण आमच्या राजकीय विरोधकांच्या डोक्यात प्रश्नांचे किडे जरा जास्तच वळवळत आहेत. ‘युती’मुळे हे किडेमकोडे साफ चिरडले जातील या भीतीतून त्यांची वळवळ सुरू झाली असल्याचा टोला लगावला होता. याच अग्रलेखाचा आधार घेत धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

धनंजय मुंडे यांनी शाहरूख खान, प्रीती झिंटा अभिनित वीर-झारा चित्रपटातील गाण्याचे कडवे “तेरे लिए हम हैं जिये होठों को सीये” ट्विट केले असून ‘सामना’मधील आजचा अग्रलेख लता मंगेशकर यांच्या आवाजापेक्षाही गोड आहे. वाचलात का, असा सवाल केला आहे.

काय म्हटलं होतं अग्रलेखात…

दबाव आणि मुस्कटदाबी ही भुते आम्ही शिवसेनेच्या मानगुटीवर कधीच बसू दिली नाहीत. आम्ही आमचा बाणा जपला, जपत राहू. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली नाही. 2014 मध्ये भाजपकडून रीतसर काडीमोड झाला असतानाही पुन्हा एकत्र कसे? नक्की कोणत्या मुद्द्यांवर एकत्र येत आहात? महाराष्ट्रात ‘युती’च्या चर्चेला तसा पूर्णविराम मिळाला आहे. काही पोटावळ्यांना युती झाली तरी, ‘का झाली?’ असा मुरडा उठला होताच व होत नव्हती तेव्हा, ‘छे, छे, शिवसेना फारच ताणून धरते बुवा. हे काय सुरू आहे!” असले प्रश्न पडतच होते. असल्या पडेल प्रश्नांना उत्तरे देत बसण्यापेक्षा महाराष्ट्राच्या हितासाठी जी नवी जुळवाजुळव केली आहे ती घेऊन पुढे जावे यातच सगळ्यांचे हित आहे.