केवळ आरोप झाले म्हणून कोणत्याही मंत्र्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने जळगाव घरकूल घोटाळाप्रकरणी आरोपपत्र दाखल झालेले परिवहन खात्याचे राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना अभय दिले आहे.
जळगाव घरकूल योजनेत घोटाळा झाला तेव्हा सुरेश जैन हे युती सरकारच्या काळात गृहनिर्माणमंत्री होते. घरकूल योजनेच्या प्रस्तावाला शहर विकास आघाडीच्या ४८ नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. त्यात गुलाबराव देवकर हे एक नगरसेवक होते. देवकर यांची नगराध्यक्षपदी निवड होण्यापूर्वीच या कामाचे वाटप झाले होते. त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात ठेकेदाराला कोणतेही बिल देण्यात आलेले नाही वा त्यांनी कोणत्याही प्रस्तावावर स्वाक्षरी केलेली नाही. यामुळे देवकर हे दोषी नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी
केला.
आरोप झाले म्हणून राजीनामा घेतला जाणार नाही, असे मलिक यांनी सांगितले असले तरी गैरव्यवहारांचे आरोप झाल्याने मलिक यांना मागे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याकडे मलिक यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, पक्षाने आदेश दिल्यावर आपण राजीनामा दिला होता. न्यायालयाला यात काहीही गैर आढळले नव्हते, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.