‘व्होट फॉर इंडिया’ ही नरेंद्र मोदी यांची घोषणा म्हणजे अंबानी, अदानी यांच्यासारख्यांच्या फायद्याची असून, राष्ट्रवादीने मात्र शेतकरी, कामगार यांच्यासह साऱ्याच घटकांचा विचार करून ‘व्होट फॉर भारत’चा नारा दिला आहे. तर महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रावर टीका करणे म्हणजे मोदी यांनी राज्यातील १२ कोटी जनतेचा अवमान केल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत २६ तर गुजरातमध्ये १४च मुख्यमंत्री झाल्याचा मुद्दा मोदी यांना मांडला. प्रत्यक्षात महाराष्ट्रात १७च मुख्यमंत्री झाले असून, एकूण २६ वेळा शपथविधी झाला आहे. वसंतराव नाईक यांचा तिनदा, वसंतदादा पाटील आणि अशोक चव्हाण यांचा दोनदा शपथविधी झाला होता. गुजरातमध्ये १४ मुख्यमंत्र्यांचा २७ वेळा शपथविधी झाला आहे. म्हणजे मोदी यांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. ‘व्होट फॉर इंडिया’ हा नारा समाजातील धनिकांसाठी असल्याची टीकाही मलिक यांनी केली.
राज्यातील काँग्रेस सरकार भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप मोदी यांनी केला. मात्र मोदी यांनी स्वत:च्या मंत्रिमंडळातील बाबूभाई बोखारिया आणि पुरुषोत्तम सोळंकी यांच्यासारख्या भ्रष्ट मंत्र्यांविरोधात आधी कारवाई करावी, मगच त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार असल्याचा प्रतिहल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी चढविला. देशात सर्वच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र हे आघाडीचे राज्य असून, गुजरातचा बुडबुडा केव्हाच फुटला आहे. तरीही मुंबईत येऊन महाराष्ट्र कसा मागे हे दाखविण्याचा केवीलवाणा प्रयत्न म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा अवमान असल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे.