एकाच वेळी अधिक रुग्णांवर उपचार करणे सोयीचे

मुंबई : दातावर डॉक्टर काही तरी उपचार करणार या कल्पनेनेही लहान मुलांची भीतीने गाळण उडते. मुलांच्या मनातील ही भीती दूर करत लक्ष वेधून घेणाऱ्या विविध सॉफ्टटॉयने सजलेल्या आकर्षक रंगसंगतीच्या २० नव्या खुच्र्या सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरातील शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता अधिकाधिक मुलांवर उपचार करणेही डॉक्टरांना सोयीचे होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या आवारात वसलेले शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात स्वतंत्र बाल दंत रोग विभाग गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. त्यामुळे येथे वाडिया रुग्णालयापासून ते जे. जे. रुग्णालय, जीटी अशा अनेक रुग्णालयांतून बालकांना दंत उपचारासाठी पाठविले जाते. दरदिवशी सुमारे १५० बालके येथे उपचारासाठी येतात.

‘लहान मुलांमध्येही मोठय़ांप्रमाणेच दातांच्या अनेक समस्या असतात. अनेक तक्रारी घेऊन बालके उपचारासाठी येतात. रुग्णालयात असलेल्या खुच्र्या अनेक वर्षे जुन्या असल्याने यातील काही निरुपयोगी झाल्या आहेत. नवीन खुच्र्या देण्याची मागणी आम्ही गेल्या काही वर्षांपासून करत होतो. अखेर शासनाने २० खुच्र्याना परवानगी दिली आणि या खुच्र्या रुग्णालयात दाखल झाल्या आहेत,’ असे शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. डिम्पल पाडावे यांनी सांगितले.

दंत उपचारात खुर्ची ही एक महत्त्वाचे साधन असते. विभागात पदव्युत्तर आणि पदवीधर दोन्ही विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे दोन्ही विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी खुच्र्या कमी पडत होत्या. तसेच मुलांनाही बराच काळ थांबावे लागत होते. नव्या खुच्र्यामुळे त्यांचीही गैरसोय होणार नाही. यात बाळांना उपचार करताना दुखू नये म्हणून गॅसद्वारे भूल देणाऱ्या तीन खुच्र्याचाही समावेश आहे. अद्ययावत झालेल्या या विभागाचे उद्घाटन संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.

चित्रस्वरूपात दंतशास्त्राचा इतिहास