कुशल कामगारांअभावी काम मंदावले; नव्या कामगारांचा शोध सुरू

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाच्या भीतीमुळे कुशल कामगारांनी गावची वाट धरल्यामुळे शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई किनारा मार्ग प्रकल्पाच्या कामात नवे विघ्न उभे राहिले आहे. निरनिराळ्या कारणांमुळे विलंबाने सुरू झालेले प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करता यावा यासाठी आता कुशल कामगारांचा शोध सुरू करण्यात आला आहे, तर दुसरीकडे गावी गेलेल्या कामगारांना परत आणण्यासाठी विनवण्या करण्यात येत आहेत.

नरिमन पॉइंट परिसरातून जलदगतीने पश्चिम उपनगरांमध्ये पोहोचता यावे, दक्षिण मुंबईसह विविध ठिकाणी होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा, या

उद्देशाने प्रिन्सेस स्ट्रीट येथील उड्डाणपुलापासून कांदिवलीपर्यंत ३५.६० कि.मी. लांबीचा मुंबई किनारा मार्ग प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या मुंबई किनारा मार्ग प्रकल्पाकडे पाहिले जाते. मात्र आवश्यक त्या परवानग्या मिळविण्यासाठी करावी लागलेली प्रतीक्षा, पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केलेले मुद्दे, मच्छीमार बांधवांनी केलेला विरोध, न्यायप्रविष्ट झालेले प्रकरण आदी विविध बाबींमुळे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम विलंबाने सुरू झाले.

पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी उद्यान, प्रियदर्शनी उद्यान ते बडोदा हाऊस आणि बडोदा हाऊस ते वरळी सागरी सेतूचे दक्षिण टोक अशा ९.९८ कि.मी. लांबीच्या कामाची कंत्राटे कंत्राटदारांना देण्यात आली. नियोजित वेळेत पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले होते.

करोनाच्या संसर्गाचा धोका वाढत गेला आणि मुंबईतील परप्रांतीय कामगारांनी आपल्या गावाची वाट धरली. मुंबई किनारा मार्ग प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुमारे ७०० कामगार करीत होते. त्यापैकी १००हून अधिक कामगारांनी गावची वाट धरली. मात्र हे बहुतांश कामगार कु शल असल्याने प्रकल्पाचे काम मंदावले आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

सांगाडा तयार करण्याच्या कामावर परिणाम

* लोखंडी सळ्या जोडून सांगाडा तयार करण्याचे काम करणारे बहुतांश कामगार गावी निघून गेले आहेत. त्यामुळे सांगाडा तयार करण्याच्या कामावर परिणाम झाला आहे.

* असे कुशल कामगार मिळू शकतील का याची चाचपणी सुरू आहे. गावी गेलेल्या काही कामगारांशी संपर्क साधून परत बोलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

* मात्र एकूण परिस्थिती पाहता कुशल कामगारांच्या अभावामुळे आणखी एक विघ्न किनारा मार्ग प्रकल्पासमोर उभे राहिले आहे.