मुंबईहून गुजरातमध्ये रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या आंगडियांच्या (खाजगी कुरियर) चार ट्रकवर राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि प्राप्तिकर खात्याने टाकलेल्या संयुक्त छाप्यात कोटय़वधींची रोकड आणि दागदागिने हाती लागले आहेत. एखाद्या कारवाईत एवढी प्रचंड रोकड हाती लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रकरणी ४७ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ही रक्कम नेमकी किती हे अद्याप गुलदस्त्यातच असले तरी किमान २०० ते २५० कोटींच्या घरात ती असल्याचे बोलले जात आहे.
मुंबईतून मोठय़ा प्रमाणावर रोख रक्कम गुजरातमध्ये नेली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मिळाली होती. त्यांनी प्राप्तिकर खात्याच्या मदतीने सोमवारी रात्री मुंबई सेंट्रल स्थानकात उभ्या असलेल्या चार ट्रकवर छापा घालून आतील १०२ बॅगा जप्त केल्या. या बॅगांमध्ये रोख रक्कम व दागिने होते. पन्नासहून अधिक अधिकाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला. या सर्व जप्त केलेल्या बॅगांमधील रोख रकमेची मोजणी अद्याप सुरू असून सकाळपर्यंत ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात प्राप्तिकर विभागाचे महासंचालक स्वतंत्र कुमार यांनी सांगितले की, मुंबईतील व्यापाऱ्यांचा हा पैसा आंगडियांमार्फत गुजरातमध्ये जात होता. तो नेमका कुणाकुणाचा आणि किती आहे, त्याची चौकशी केली जात आहे. चौकशीसाठी ट्रकचे चालक आणि डिलिव्हरी बॉय मिळून ४७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा पैसा दहशतवादी कारवायांसाठी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे दागिने अधिकृत असले तर परत केले जातील. पण कोटय़वधी रुपये दुसऱ्या राज्यात पाठविण्याची ही पद्धत अनधिकृत असल्याने त्यावर कारवाई केली जाईल असेही स्वतंत्र कुमार यांनी सांगितले.

पोलिसांचे संरक्षण : विशेष म्हणजे या बॅगा गुजरातेत नेल्या जात असताना मुंबई पोलिसांचे त्याला संरक्षण होते. आंगडिया नियमित पैशांची देवाण घेवाण करत असतात. त्यांच्यावर प्राणघातक हल्लेही होतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी गेली अनेक वर्षे पोलीस बंदोबस्त दिला जात असल्याचे परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त निसार तांबोळी यांनी सांगितले. या बॅगांमध्ये काय आहे त्याची कल्पना पोलिसांना नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नोटाच नोटा..! : बॅगांमधून निघालेल्या नोटा पाहून अधिकाऱ्यांसह सर्वाचे डोळे विस्फारले आहेत. या नोटा मोजण्याचे काम ‘सिंदिया हाऊस’मध्ये सुरू आहे. त्यासाठी नोटा मोजण्याची १५ यंत्रे, ५० हून अधिक बँक अधिकारी, दागिन्यांची किंमत ठरविणारे सराफ यांना कामाला लावण्यात आले आहे. दागिने आणि रोख रक्कम मिळून हा ऐवज दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांच्या घरात असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.