धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक याच्याविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने गुरुवारी अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. आपल्या चिथावणीखोर भाषणांच्या माध्यमातून दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप झाकीर याच्यावर आहे. गेल्याच आठवडय़ात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) स्थापन विशेष न्यायालयानेही नाईक याच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होते.

ढाका येथे दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांनी  नाईक याच्या भाषणाने प्रेरित झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर एनआयएने बेकायदा कारवाई प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. चौकशीसाठी हजर राहण्याबाबत तीन वेळा समन्स बजावूनही झाकीर हजर झाला नाही. त्याला भारतात परत आणण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्याची गरज आहे, असे एनआयएच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.

तसेच त्याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्याची विनंती करण्यात आली. चौकशीत तो सहकार्य करत नसल्याची कागदपत्रेही सादर करण्यात आली. त्यावर नाईक याने एकदाही एनआयएच्या समन्सला प्रतिसाद दिलेला नाही. यावरून तो अटक टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे आणि तो कधीही चौकशीसाठी हजर होणार नाही हे स्पष्ट होत आहे, असे नमूद करत विशेष न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी एनआयएची ही विनंती मान्य करत नाईक याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले.

‘इस्लामिक रीसर्च फाऊंडेशन’चा (आयआरएफ) संस्थापक असलेल्या नाईकवर या संस्थेला निधी मिळवण्याच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी विशेष न्यायालयानेही अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते.