निसर्ग चक्रीवादळाने कोकणाला व त्यातही रायगड जिल्ह्य़ाला जोरदार तडाखा दिला असून राज्यभरात सहा जण ठार तर १६ जण जखमी झाले आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार रायगडमधील ५०३३ हेक्टर शेतीचे आणि जवळपास ५ लाख घरांचे नुकसान झाले आहे. याशिवाय विद्युत यंत्रणा, मोबाइल टॉवर, झाडे कोसळल्याने व अंतर्गत रस्ते खराब झाल्याने दळणवळण आणि दूरसंचार सेवा कोलमडली. चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तातडीने देण्याचा आणि नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून कोकणातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली.  चक्रीवादळामुळे राज्यात सहा जण ठार तर १६ जण जखमी झाले. मृतांमध्ये रायगडमधील दोन, पुण्यातील तीन तर अहमदनगरमधील एकाचा समावेश आहे.

६ जनावरेही दगावली आहेत, अशी माहिती प्रधान सचिव मदत व पुनर्वसन किशोर राजे निंबाळकर यांनी दिली. त्यावर मृत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपये सानुग्रह अनुदान लगेच द्यावे, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करावेत म्हणजे शेतकरी व गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्य़ात दापोली व मंडणगडमध्ये जास्त नुकसान झाले आहे. ३ हजार झाडे पडली आहेत. १४ उपकेंद्रे, १९६२ रोहित्रे-विजेचे खांब पडले आहेत, पाणीपुरवठय़ाची व्यवस्था काही ठिकाणी विस्कळीत झाली आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

रायगड जिल्ह्यमध्ये घरांचे नुकसान झाल्याने त्यांच्याकडे स्वयंपाक-पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यांना तातडीने अन्न धान्य पोहचवावे. महावितरणाने अधिकचे मनुष्यबळ या भागात लावून वीज पुरवठा पहिल्यांदा सुरु  करावा. रुग्णालये, दवाखाने यांना वीज पुरवठा सुरू राहणे गरजेचे आहे. नुकसान भरपाई देतांना नागरिकांना विश्वासात घ्या. मुंबई परिसरातील  छावण्यांमध्ये हलविलेल्या नागरिकांना सोडताना त्यांची  करोना चाचणी करून घ्यावी.  पूर्व किनाऱ्यावर अशी वादळे नवीन नाहीत पण आता पश्चिम किनाऱ्यावर मुंबई आणि आसपासच्या भागाला खूप वर्षांनी असे वादळ आल्याने भविष्यासाठी तयारीही ठेवावी लागेल.

रायगडला तडाखा

रायगड जिल्ह्यत लाखो घरांचे नुकसान झाले आहे. एक लाखाहून जास्त झाडे पडली आहेत. श्रीवर्धन आणि मुरूडच्यामध्ये चक्रीवादळ धडकल्याने त्याचा फटका श्रीवर्धनला जास्त बसला असून सर्व दळणवळण ठप्प झाले आहे. विजेचे खांब हजारोंच्या संख्येने पडले आहेत.  जिल्ह्यंत ५ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून पंचनाम्यासाठी पथके बाहेर पडली आहेत. मात्र अंतर्गत रस्ते खूप खराब झाले आहेत. काही ठिकाणी रुग्णवाहिकाही पाठवणे शक्य झालेले नाही. दूरध्वनी व मोबाइल सेवा खंडित झाल्याने लोक घाबरले आहेत, त्यांना इतरांशी संपर्क शक्य होत नाही. टेलिकॉम यंत्रणा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वीज नसल्याने ५०० मोबाइल टॉवर बंद पडले आहेत.

वीजपुरवठा सुरळीत होण्यास तीन-चार दिवस लागणार

रायगड जिल्ह्य़ात महावितरणच्या विद्युत यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. वीजपुरवठा दोन दिवसांत सुरळीत करण्याचा आदेश महावितरणला देण्यात आला आहे. मात्र, मुळात अनेक ठिकाणी रस्ते खराब झाल्याने पोहोचयाला वेळ लागणार आहे. शिवाय स्थानिक वीज कर्मचाऱ्यांच्या घरांचेही नुकसान झाल्याने  मनुष्यबळाची जुळवाजुळव करावी लागणार असून साहित्य-सामुग्रीही ठिकठिकाणाहून आणावी लागेल. त्यामुळे  संपूर्ण जिल्ह्य़ात परिस्थिती सुरळीत होण्यास चार दिवस तरी जातील, असे महावितरणमधील सूत्रांनी सांगितले.