नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रविवारी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. यावेळी त्यांनी आपण लवकरच पक्षाची नोंदणी करणार असून, लवकरच पक्षाची भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांना तुमच्या पक्षात कोणकोण येणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राणे यांनी म्हटले की, आता मी दुकान उघडले असून कोण आमच्यासोबत येणार हे आगामी काळात कळेल. नारायण राणेंच्या दाव्याप्रमाणे काँग्रेसचे काही आमदार त्यांच्याबरोबर गेल्यास विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येऊ शकते. काँग्रेसमधून राणे यांच्यासोबत बाहेर पडणाऱ्यांमध्ये त्यांचे पूत्र नितेश आणि कट्टर समर्थक कालिदास कोळंबकर यांचे नाव पक्के मानले जात आहे. मात्र, काल झालेल्या पत्रकार परिषदेपासून हे दोन्हीही नेते लांब राहिले होते. त्यामुळे राणेंच्या डोक्यात नक्की काय शिजतंय, याचा अंदाज अद्याप आलेला नाही. याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असताना नितेश राणे यांनी एक ट्विट करून आणखी संभ्रम निर्माण केला आहे. नितेश यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मुलासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘माझ्या मुलाने त्याच्या आजोबांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केलाय, मी अजूनही वाट पाहतोय’, असे लिहिले आहे. त्यामुळे नितेश राणे आता नक्की काय करणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.