पश्चिम रेल्वेच्या चर्चगेटसारख्या महत्त्वाच्या स्थानकात गाडी भरधाव वेगात शिरून थेट प्लॅटफॉर्मवर चढल्याच्या घटनेनंतर तत्कालीन महाव्यवस्थापकांनी सर्व महत्त्वाच्या स्थानकांत साहाय्यकारी इशारा प्रणाली (ऑक्झिलरी वॉर्निग सिस्टीम) बसवण्याचे आदेश दिले होते. मध्य रेल्वेवरील महत्त्वाच्या स्थानकांवर ही प्रणाली बसवण्यात आली असली, तरी पश्चिम रेल्वेवर मात्र अनेक स्थानकांवर ही प्रणाली अद्यापही बसवण्यात आलेली नाही. चर्चगेट वगळता इतर सर्व स्थानकांवर ही प्रणाली बसवली नसल्याने प्रवासी सुरक्षा अजूनही वाऱ्यावरच आहे.भाईंदरहून चर्चगेटच्या दिशेने येणारी गाडी रविवार, २८ जून रोजी चर्चगेट स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक तीन तोडून प्लॅटफॉर्मवर चढली होती. ‘न भूतो, न भविष्यति’ प्रकारच्या या अपघाताचा ठपका मोटरमनच्या निष्काळजीपणावर ठेवण्यात आला होता. तसेच पश्चिम रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी या अपघातानंतर मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या प्रत्येक टर्मिनस स्थानकात साहाय्यकारी इशारा प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला होता.
या अपघाताला चार महिने उलटून गेले, तरीही पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट वगळता एकाही टर्मिनस स्थानकात ही प्रणाली बसवली नसल्याचे स्पष्ट होत आहे. चर्चगेट स्थानकातील चारही स्थानकांवर प्लॅटफॉर्म संपतात, तेथे ही प्रणाली बसवण्यात आली आहे. मात्र अंधेरी, बोरिवली, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, वसई आणि विरार या स्थानकांमध्ये अद्यापही ही प्रणाली बसवलेली नाही, असे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांनी सांगितले. चर्चगेटनंतर आता या स्थानकांमध्ये साहाय्यकारी चेतना प्रणाली बसवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या उलट मध्य रेल्वेवर कर्जत, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, ठाणे, पनवेल आणि कल्याण या स्थानकांवर ही प्रणाली बसवण्यात आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथेही ही प्रणाली बसवण्याचे काम येत्या पंधरवडय़ात पूर्ण होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पश्चिम रेल्वेवर झालेल्या अपघातानंतर मध्य रेल्वेने सुरक्षा उपाय म्हणून आपल्या स्थानकांवर ही प्रणाली बसवून घेतली असताना पश्चिम रेल्वेने मात्र दिरंगाई केल्याचे दिसून येत आहे. परिणामी पश्चिम रेल्वेवरील प्रवासी सुरक्षेचा प्रश्न अद्यापही ऐरणीवरच आहे.