संस्कृत भाषेच्या अभिजातपणाला आणि मौखिक परंपरेला तिलांजली देत नव्याने तयार करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या संस्कृत (मंदाकिनी-१०० गुणांचे) भाषेच्या पाठय़पुस्तकाबाबतही भूगोलाच्या पाठय़पुस्तकाप्रमाणे शिक्षकांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मराठीच्या पुस्तकातून पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज हद्दपार करत कुण्या फ्रेंच वा जर्मन लेखकाचे मराठी भाषांतरित लेख मराठी साहित्य म्हणून खपवले तर कसे चालेल? पण ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’तर्फे नुकत्याच बाजारात आलेल्या संस्कृत विषयाच्या पाठय़पुस्तकाबाबत नेमकी हीच गोष्ट करण्यात आली आहे. भास, भवभूती, कालिदास या संस्कृतमधील आद्यरचनाकारांच्या साहित्यसंपदेवर पूर्णत: काट मारून तयार करण्यात आलेल्या या पाठय़पुस्तकामध्ये संस्कृत भाषेचा रसाळपणा अभावानेच आढळतो. केवळ आधुनिकतेवर भर देण्याच्या अनाठायी अट्टहासापायी अभ्यास मंडळाने संस्कृत भाषेचा अभिजाततेचा आत्माच मारून टाकल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे. त्यामुळे पुस्तक नीरस आणि कंटाळवाणे तर झालेच, पण व्याकरणाचा व्याप नको इतका वाढवून या पाठय़ुपस्तकाने संस्कृत विषयाचे ‘स्कोरिंग’चे उपयुक्ततामूल्यही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने संपवून टाकले आहे, अशी टीका शिक्षकांकडून केली जाते आहे.
शिक्षकांचा मुख्य आक्षेप पाठय़पुस्तकातील सुभाषितांबाबत आहे. ‘यातली सर्व सुभाषिते पूर्णपणे अपरिचित तर आहेत. तसेच ती भिन्नभिन्न वृत्तात असल्याने वेगवेगळ्या चालीत म्हणावी लागणार आहेत. त्यामुळे ती पाठ करण्यास कठीण आहेत. गेयता हे सुभाषितांमध्ये प्रमुख वैशिष्टय़ आहे. पण ही सर्व सुभाषिते अतिशय दुबरेध, नीरस आहेत,’ असे परखड मत संस्कृतचे शिक्षक प्रा. जगदीश इंदलकर यांनी व्यक्त केले.
‘मुळात संस्कृत ही मौखिक परंपरा असलेली भाषा आहे. पाठांतर ही या विषयाची प्रमुख गरज आहे, पण पाठांतरावर आधारित प्रश्नच असू नये, या दृष्टिकोनाच्या अतिरेकामुळे या प्रकारच्या प्रश्नांनाच पाठय़पुस्तकात तिलांजली देण्यात आली आहे. तसेच संस्कृतमध्ये उपलब्ध असलेले मूळ साहित्य आतापर्यंतच्या पाठय़पुस्तकात समाविष्ट होते. तेच आता वगळण्यात आले आहे. त्यामुळे पाठय़पुस्तकाला संस्कृत भाषेची डूब येत नाही,’ अशी टीका टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रा. हेमा डोळे यांनी केली.
‘भास, भवभूती, कालिदास, बाणभट्ट हे संस्कृतचे आद्यरचनाकार आहेत, पण त्यांच्या साहित्याऐवजी मूळ मिझो कथेच्या इंग्रजी भाषांतरावरून केलेले संस्कृत भाषांतराचे पाठ पुस्तकात समाविष्ट करून भाषेचा आत्माच मारून टाकण्याचे काम अभ्यास मंडळाने केले आहे. अशा प्रकारचे उतारे पुस्तकात जागोजागी आढळतील,’ याकडे इंदलकर यांनी लक्ष वेधले. ‘शीलालेखा’वरील एक उतारा देण्यामागचे तर उद्दिष्टच कळत नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.(क्रमश:)

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन