मुंबई : आपल्यावर देशद्रोहाप्रकरणी दाखल गुन्ह्य़ामुळे पारपत्र प्राधिकरणाने पारपत्र नूतनीकरणास नकार दिल्याचा दावा अभिनेत्री कंगना राणावतने याचिकेद्वारे केला आहे. मात्र कंगनाने आपल्या याचिकेत पारपत्र प्राधिकरणाला प्रतिवादीच केलेले नाही. तिची याचिकाही अस्पष्ट असल्यावर बोट ठेवत उच्च न्यायालयाने मंगळवारी तिला याप्रकरणी तातडीने दिलासा देण्यास नकार दिला.

पारपत्र प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच पारपत्र प्राधिकरणाला पारपत्र नूतनीकरण करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

न्यायमूर्ती प्रशांत वाराळे आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर कंगनाच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्या वेळी याचिकेत कंगनाने पारपत्र प्राधिकरणाला प्रतिवादीच के लेले नाही. शिवाय तिच्या पारपत्राचे नूतनीकरण का करणार नाही याबाबत प्राधिकरणाने काय म्हटले वा काय आदेश दिला याबाबतही तिने याचिकेत काहीच स्पष्ट लिहिलेले नाही याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.

त्यावर देशद्रोहाप्रकरणी दाखल गुन्ह्य़ामुळे पारपत्राचे नूतनीकरण करण्यास प्राधिकरणाने तोंडी आक्षेप घेतल्याचे कंगनाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. परंतु तोंडी दिलेल्या आदेशाबाबत वा आक्षेपाबाबत आम्ही याचिके वर आदेश कसा देणार, अशी विचारणाही न्यायालयाने केली.

कंगनाच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता तिच्या पारपत्राचे नूतनीकरण योग्य आहे. परंतु त्यासाठीच्या अर्जात तिच्या बहिणीच्या नावाचा समावेश असल्यावरूनही न्यायालयाने कं गनाला फटकारले. त्याचवेळी प्राधिकरणाला प्रतिवादी करण्याची कंगनाची विनंती मान्य करत प्रकरणाची सुनावणी पुढील आठवडय़ात ठेवली.