शिवसेनेमध्ये नेतेपदाची माळ गळ्यात पडल्याने पक्षात नंबर दोनच्या पदावर बढती मिळल्यानंतर युवासेनेच्या कार्यकारणी बैठकीत आदित्य ठाकरे यांनी नेता म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना पहिला ‘आदेश’ दिला आहे. हा आदेश रस्त्यारस्त्यांवर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांकडून लावण्यात येणाऱ्या होर्डिंग्स संदर्भात आहे. यापुढे शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी अथवा पदाधिकाऱ्यांनी ‘दादा’, ‘भाई’, ‘अण्णा’, ‘अप्पा’, ‘काका’, ‘मामा’ असे शब्द असणारे शुभेच्छांचे होर्डिंग्ज लावू नयेत असा आदेश वजा तंबीच आदित्य यांनी दिली आहे.
या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती शिवसेनेमधील युवासेनेच्या एका पदाधिकाऱ्याने ‘मिड डे’ या वृत्तपत्राला दिली. होर्डिंग्सवर ‘दादा’, ‘मामा’, ‘काका’, ‘भाई’ अशी टोपणनावे वापरण्याविरोधात अदित्य ठाकरेंनी बैठकीत सुचना केल्या. शिवसेनेबरोबरच इतर पक्षांमध्येही अशाप्रकारची टोपणनावे वापरली जातात. मात्र सध्याच्या तरुणाईला ही अशी विशेषणे फारशी रुचत नाहीत. म्हणूनच हा बदल नक्कीच चांगला असल्याचे मत या पदाधिकाऱ्याने व्यक्त केले.
वेगवेगळ्या समारंभांसाठी तसेच वाढदिवसांच्या काळातही अशाप्रकारचे शुभेच्छांचे होर्डिंग्स सरसकटपणे लावलेले दिसतात. या होर्डिंग्जमुळे सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपिकरण होते. या बरोबरच स्थानिक जनतेलाही अशा प्रकारची होर्डिंगबाजी आवडत नसल्याने अनेकदा त्यांच्या रोषालाही सामोरंही जावं लागतं. अशा सर्व कारणांना लक्षात घेऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारची होर्डिंग्ज यापुढे होणार नाही यासंदर्भात योग्य ती खबरदारी घेतली जावी असे आदेशच आदित्य ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिलेत.
मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या शहरांबरोबरच जिल्हा तसेच गावाच्या ठिकाणीही पक्षाच्या एखाद्या बड्या नेत्याचा वाढदिवस असला की पक्ष कार्यकर्ते शहरभर शुभेच्छांचे होर्डिंग्ज लावतात. त्यावर नेत्यांच्या फोटोबरोबरच अनेक स्थानिक कार्यकर्त्यांचेही फोटोही असतातच. हा सर्व प्रकार योग्य नसून ही होर्डिंगबाजी थांबली पाहिजे असे मत अदित्य यांनी व्यक्त केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2018 3:25 pm