गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्नावर मंगळवारी तोडगा निघण्याची आशा फोल ठरली. अर्थमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांच्यात मंगळवारी या प्रश्नावर बैठक झाली. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन व अन्य खर्चासाठी महामंडळाकडून शासनाला येत्या गुरुवारी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यानंतरच या प्रश्नावर चर्चा होऊन तोडगा निघेल.

एसटी महामंडळातील एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांचे जुलै-ऑगस्ट महिन्यांचे वेतन अद्याप झालेले नाही. करोनानंतर एसटीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे ७५ टक्के , एप्रिलचे १०० टक्के , तर मे महिन्याचे के वळ ५० टक्के  वेतन मिळाले. वेतनाबाबतची अनिश्चितता अजूनही सुरू आहे. आतापर्यंत राज्य सरकारकडून महामंडळाला आर्थिक मदत केली जात होती. अर्थ व परिवहनमंत्र्यांच्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा झाली. बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन व अन्य खर्चासाठी डिसेंबपर्यंत निधी देण्याची मागणी करण्यात आली. चर्चेनंतर एसटी महामंडळाला गुरुवारी प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.