जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती

पालिकेच्या जल विभागाने जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती, नवी जलवाहिनी कार्यान्वित करणे आणि जलवाहिनीची जोडणी करण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईच्या शहर भागातील काही परिसरात बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जे. जे. रुग्णालय, केईएम आणि टाटा रुग्णालयाचा पाणीपुरवठाही या कामामुळे बुधवारी बंद ठेवावा लागणार आहे.

जल विभागाने भंडारवाडा जलकुंभ येथे जुन्या १२०० मि.मी. व्यासाच्या बाबुला टँक जलवाहिनीच्या दुरुस्तीचे, तसेच रफी अहमद किडवाई मार्गावरील नवी १५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. नव्या जलवाहिनीची नया नगर, माथार पाखाडी व  शिवडी कोर्ट जंक्शन येथे जुन्या जलवाहिनीला जोडणी करण्यात येणार आहे. हे काम बुधवारी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत करण्यात येणार आहे. या कामानिमित्त भंडारवाडा टेकडी जलकुंभ, गोलंजी टेकडी जलकुंभ, फोसबेरी जलकुंभ १२ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

या भागांमध्ये पाणीपुरवठा नाही

या कामामुळे नेव्हल डॉक, बीपीटी पी. डिमेलो रोड, संत तुकाराम रोड, फ्लँक रोड, केशवजी नाईक रोड, मोदी कम्पाऊंड, डी. एन. सिंग रोड, हुसेन पटेल रोड, रामचंद्र भट्ट मार्ग, ई. एस. पाटणवाला मार्ग, मोतीशहा लेन, डॉ. मस्करहॅन्स रोड, रामभाई भोगले मार्ग, डॉकयार्ड रोड, गनपावडर रोड, कारपेंटर रोड, नवाब टँक रोड, बॅरिस्टर नाथ पै मार्ग, जे. जे. हॉस्पिटल, जी. डी. आंबेकर रोड, परेल मौजे (व्हिलेज), एकनाथ घाडी मार्ग, जिजामाता नगर झोपडपट्टी, आंबेवाडी, डी. जी. महाजनी रोड, टी. जे. रोड, आचार्य दोंदे मार्ग, बारादेवी, शिवाजी नगर, केईएम, टाटा हॉस्पिटल येथे बुधवारी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर आसपासच्या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे जल विभागातील सूत्रांनी सांगितले. पाणी कपातीच्या काळात जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.