‘स्पर्धात्मकता आपल्याला संकुचित वृत्तीचा बनविते. आपल्याला वैश्विक नागरिक बनायचे असेल तर आपल्यापुरती स्वप्ने पाहणे सोडून देशाचा आणि जगाला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा विचार करा,’ असा कानमंत्र नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’चा (आयआयटी) ५३वा दीक्षांत समारंभ संस्थेच्या पवई येथील संकुलात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ‘महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र’चे अध्यक्ष आनंद महिंद्र यांना यावेळी डी.लिट. देऊन गौरविण्यात आले. तर प्रा. दिनेश शर्मा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी २३८९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यात २५० पीएच.डी. पदव्यांचा समावेश आहे. यावेळी आर. अश्विन याला राष्ट्रपती पदक, एस. विघ्नेश याला संस्थेचे सुवर्ण पदक आणि प्रवेश कोचर याला डॉ. शंकर दयाळ शर्मा सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले.
‘तुम्ही जगातील सर्वाधिक हुशार विद्यार्थ्यांपैकी आहात. त्यामुळे, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बदल आणून इतिहास घडविण्याची ताकद तुमच्यात आहे. स्वत:साठीची तुमची स्वप्नेही मोठी असतात. परंतु पुढच्या १० वर्षांत देशासाठी आणि जगासाठी मी काय परिवर्तन आणू शकेन याचा विचार तुम्ही केला पाहिजे. अभियांत्रिकीचे विद्यार्थी असल्याने तुमच्याकडे विश्लेषणाची व निर्मितीची क्षमता आहे. त्याचा वापर बदल आणण्याकरिता करा,’ असे स्वत: इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे पदवीधर असलेल्या सत्यार्थी यांनी विद्यार्थ्यांना सुचविले.
‘आजच्या पदवीदानानंतर तुमच्या नावापुढे ‘डी’ (डॉक्टर या अर्थाने) लागेल, परंतु याबरोबरच तीन ‘डी’ तुमच्या आयुष्याचे मंत्र बनू दे. पहिला म्हणजे ‘ड्रीम’ (स्वप्न पाहा).  तुमची स्वप्नेही वैश्विकतेकडे जाण्याइतकी मोठी असली पाहिजे. दुसरा ‘डी’ जो ‘डिस्कव्हर’ म्हणजे शोधाने साध्य होणार आहे. आणि तिसरा ‘डू’. थोडक्यात तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या शोधक वृत्तीने प्रत्यक्ष कार्य करणे या तीन तत्त्वांच्या आधारे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात नेतृत्व तर करालच पण आपल्या कामाने सुबत्ताही आणू शकाल,’  असा मूलमंत्र त्यांनी दिला.

काकोडकर यांची अनुपस्थिती
मुंबई-आयआयटीच्या ‘बोर्ड ऑफ गव्हर्नन्स’चे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ संशोधक व केंद्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आतापर्यंत संस्थेच्या दीक्षांत समारंभात व्यासपीठावर उपस्थित राहत आले आहेत. परंतु आयआयटी संचालक नेमणुकांवरून सरकारशी उद्भवलेल्या वादामुळे डॉ.काकोडकर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांची व्यासपीठावरील अनुपस्थिती विशेषत्वाने जाणवत होती. संस्थेचे संचालक डॉ. खक्कर यांनीही डॉ. काकोडकर यांचा आवर्जून उल्लेख केला.