बहिरेपणा, कानांना दडे बसण्यासोबत हृदयविकाराच्याही तक्रारी वाढल्याचे निरीक्षण

ढोलताशे, डीजे, ध्वनिक्षेपक यांचा कानठळ्या बसविणारा दणदणाट मानसिक आरोग्याबरोबरच कायमचा बहिरेपणा, हृदयविकार यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या आजारांनाही कारणीभूत ठरतो आहे. कल्याणमध्ये एका गणेशोत्सव मंडळातील डीजेच्या कर्कश आवाजामुळे तेथील एका रहिवाशाला सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली. हृदयविकाराशी संबंधित अशा अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारींबरोबरच बहिरेपणा, कानांना दडा बसणे अशा तक्रारी घेऊन रुग्ण डॉक्टरांकडे येत आहेत.

९० डेसिबलपेक्षा अधिक आवाजामुळे मानसिक स्वास्थ्य तर बिघडतेच, शिवाय तो जिवावर कसा बेतू शकतो याचा अनुभव सोमवारी एका कल्याणमधील रहिवाशाला आला. ही व्यक्ती एका गणेशोत्सव मंडळाची पदाधिकारी आहे. गणेशोत्सव काळात सतत कानठळ्या बसविणाऱ्या डीजेमुळे सोमवारी त्यांची प्रकृती अचानक खालावली. कर्णकर्कश आवाजामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे अनुमान डॉक्टरांनी काढले असून सध्या ही व्यक्ती अतिदक्षता विभागात दाखल आहे; परंतु ही व्यक्ती ज्या मंडळाची पदाधिकारी आहे, त्याची बदनामी नको म्हणून घरची मंडळी या संबंधात उघडपणे माहिती देण्यास नकार देत आहेत; परंतु ही एकमेव घटना नसून या काळात हृदयविकार अथवा बहिरेपणाशी संबंधित अनेक तक्रारी आपल्याकडे येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यात सामान्यजनांबरोबरच ढोलताशे वाजविणाऱ्या तरुण-तरुणींचाही समावेश आहे, हे विशेष.

‘‘कर्णकर्कश आवाजामुळे मेंदूकडून कानापर्यंत येणारी नस खराब होते. या खराब झालेल्या नसेवर उपचार करता येत नाही. कानाच्या पडद्यावर परिणाम झाला किंवा इजा झाली तर कानाचा पडदा बदलता येऊ शकतो. मात्र नस खराब झाली तर रुग्णाला कायमचे बहिरेपण येते. त्यामुळे जेथे सर्वसाधारणपणे वयाच्या ६० व्या वर्षी बहिरेपणा येतो तिथे तो ४०व्या वर्षांतच येतो, असे के.जे. सोमय्या रुग्णालयाचे कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. दिनेश वैद्य यांनी सांगितले. गणेशोत्सव काळात कायमचा बहिरेपणा आलेल्या दोघा जणांवर सध्या डॉ. वैद्य उपचार करीत आहेत.

दुसरीकडे मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी मोठय़ा आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची भीती असते. त्यामुळे गणेशोत्सव, दिवाळी, दहीहंडी आणि उत्सवांच्या दरम्यान मोठय़ा आवाजामुळे त्रस्त झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होते, असे जसलोक रुग्णालयाचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हरीश मेहता यांनी सांगितले.

डीजेमध्ये ‘हुपर’ या यंत्रामुळे हृदयाची धडधड वाढते आणि हृदयाची पूर्णत: उघडझाप होत नाही. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होत नाही आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. अशा प्रसंगी बेशुद्ध होणे, डोके दुखणे, घाबरल्यासारखे होणे, अस्वस्थ वाटणे, अशा समस्या निर्माण होतात. डीजे किंवा कर्कश ढोलताशांच्या आवाजामुळे होणारा परिणाम शारीरिक आणि मानसिकही असतो. यामुळे तणाव वाढणे, चिडचिडपणा वाढणे, मळमळणे हा त्रास सुरू होतो, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी सांगितले.

कर्कश आवाजामुळे फुफ्फुसांमध्ये हवेचा फुगा तयार होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते, तर बऱ्याचदा जे मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकाराने ग्रस्त असतील अशा रुग्णांना याचा धोका अधिक आहे, तर १८० ते २०० डेसिबल इतक्या आवाजामुळे सर्वसाधारण व्यक्तीलाही हृदयाचा विकार जडण्याची शक्यता वाढते. तर यामुळे येणारा बहिरेपणा हा कायमचा असतो.

– डॉ. डिलन डिसूजा, कान, नाक, घसा विभाग, जसलोक रुग्णालय