मधुमेह पूर्ण बरा करण्याची, डोक्यावर केस उगवण्याची, हमखास वजन कमी करण्याची.. अशा एक ना अनेक समस्यांवर हमखास उपायांची ग्वाही देणाऱ्या जाहिरातींना अनेकजण भुलतात. या भूलथापा करणाऱ्या डॉक्टरांविरोधात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने (एमएमसी) आक्रमक भूमिका घेतली असून, २०१४ च्या वर्षभरात तब्बल ७९ डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे त्यातील ४० डॉक्टरांच्या जाहिरातींची माहिती अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड काउन्सिल ऑफ इंडियाने (आस्की) एमएमसीकडे दिली.
अ‍ॅलोपथीची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी करण्याचे तसेच त्यांच्यावर कारवाईचे अधिकार असलेल्या एमएमसीकडून उपचारांचे खोटे दावे करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई केली जाते. टीव्ही व वृत्तपत्रांमधील जाहिरातींच्या दाव्यांवर नियंत्रणासाठी जाहिरातींच्या नोंदी ठेवण्याची यंत्रणा असलेल्या आस्कीकडे डॉक्टरांवर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे आस्कीने त्यांच्याकडील नोंदीनुसार ४० डॉक्टरांची माहिती एमएमसीकडे पाठवली. त्यानुसार एमएमसीने कारवाई केली.
सुरुवातीला सूचना देऊनही डॉक्टरांनी जाहिराती सुरू ठेवल्या तर त्यांचे निलंबन केले जाते, असे एमएमसीच्या एथिकल समितीचे मुख्य डॉ. सुहास पिंगळे यांनी सांगितले. भलेबुरे दावे करत रुग्णांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती टीव्ही व वर्तमानपत्रांमधून सतत येतात. याबाबत आम्ही टीव्ही किंवा वर्तमानपत्रांवर थेट कारवाई करू शकत नाही, मात्र डॉक्टरांना अशा जाहिराती करण्यापासून रोखणे हे आमचे कर्तव्य आहे. याबाबत  (आस्कीकडून होणारी मदत स्वागतार्ह आहे, असे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी सांगितले.
आतापर्यंत ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारीनुसार आस्कीकडून कारवाई होत असे, मात्र गेल्या वर्षांपासून आम्ही स्वत:च यंत्रणा उभारून टीव्ही व वर्तमानपत्रांमधील जाहिरातींवर देखरेख ठेवत आहोत. टीव्हीवर दर महिन्याला १५ हजार, तर वर्तमानपत्रातून ४० हजारहून अधिक नवीन जाहिराती येतात. डॉक्टरांवर कारवाई करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत, त्यामुळे एमएमएसीकडे आम्ही या नोंदी पाठवत असून, त्यानंतर कारवाई होत आहे, अशी माहिती आस्कीच्या सरचिटणीस श्वेता पुरंदरे यांनी दिली.
शहरानुसार डॉक्टरांवर कारवाई
*मुंबई – १९
*ठाणे – १
*पुणे – ७
*नागपूर – ४
*नाशिक – २
*कोल्हापूर – २
*जळगाव – ६
*औरंगाबाद – १२
*लातूर – १
*अहमदनगर – ४
*भुसावळ – १
*धुळे – २०
एकूण – ७९