पालिका प्रशासनाच्या रुग्णालयांना सूचना; ऑक्सिजन पुरवठ्याबाबत कार्यपद्धती निश्चिात

मुंबई : करोनाबाधित रुग्णांची गरज लक्षात घेऊन रुग्णालयांनी किमान २४ तास आधी पुरवठादारांकडे प्राणवायूची मागणी करावी, असे निर्देश मुंबई महापालिकेने दिले आहे. रुग्णांसाठी आवश्यक तेवढा प्राणवायूचा साठा अद्याप उपलब्ध झालेला नाही. उपलब्ध होणाऱ्या साठ्याचे नियोजन योग्य पद्धतीने करता यावे यासाठी पालिकेने कार्यपद्धती जाहीर केली आहे. त्यात रुग्णालयांना काही निर्देश देण्यात आले आहेत.

करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांसाठी प्राणवायूची गरज सातत्याने वाढत आहे. प्राणवायूच्या तुटवड्याची शक्यता लक्षात घेता गेल्या आठवड्यात मुंबईत काही खासगी व पालिके च्या रुग्णालयातील रुग्णांना अन्यत्र हलवण्याची वेळ ओढवली होती. पालिकेच्या सहा रुग्णालयांमधून १६८ रुग्णांना प्राणवायू उपलब्ध असलेल्या पालिकेच्याच इतर रुग्णालयांमध्ये युद्ध पातळीवर सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी घाटकोपर येथील एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू सभा रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. या रुग्णालयातील प्राणवायू साठा संपण्यास जेमतेम दीड तासांचा अवधी शिल्लक असताना रुग्णालयाने ही बाब पालिकेला कळवली. त्याही दिवशी पालिका प्रशासनाने रुग्णालयाला प्राणवायू उपलब्ध करून दिला. या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोणत्याही रुग्णालयात वेळीच प्राणवायू साठा पुरवता यावा, यासाठी पालिकेने कार्यपद्धती निश्चित केली आहे. या कार्यपद्धतीचे रुग्णालयांनी तंतोतंत पालन करावे, असे निर्देश पालिका आयुक्त चहल यांनी दिले.

या कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपायुक्त (विशेष) संजोग कबरे, प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर, कार्यकारी अभियंता  संजय शिंदे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिदास राठोड यांची समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

पालिकेच्या सूचना

प्राणवायूची मागणी पुरवठादाराकडे २४ तास किंवा त्यांच्या करारनाम्यात नमूद कालावधीनुसार करावी.

मागणी नोंदवल्यानंतर १६ तासांमध्ये पुरवठा उपलब्ध न झाल्यास पालिकेच्या विभाग नियंत्रण कक्षाला त्याची माहिती द्यावी. हा नियंत्रण कक्ष पुरवठादारांशी संपर्क साधून पाठपुरावा करेल.

विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या पाठपुराव्यानंतरही दोन तासांत प्राणवायू पुरवठा होत नसल्यास याबाबत अन्न व औषध प्रशासन नियंत्रण कक्षाला कळवले जाईल.

अन्न व औषध प्रशासन नियंत्रण कक्षला कळविल्यानंतर दोन तासांमध्ये प्राणवायूचा पुरवठा करणे शक्य होत नसल्यास गरजेनुसार विभागीय समन्वय कार्यकारी अभियंता यांना संपर्क साधतील आणि माहिती देतील.

विभागीय समन्वय कार्यकारी अभियंता हे आवश्यकतेनुसार वाहनांमधून रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा करतील आणि याबाबत वरिष्ठांना कळवतील.

त्याचप्रमाणे विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षातील अधिकारी संबंधित रुग्णालयाच्या संपर्कात राहून तेथील प्राणवायू सिलिंडर्सची नोंद ठेवतील.