मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीच्याच धर्तीवरच डायरेक्ट टू होम (डीटीएच) ग्राहकांसाठी सेट टॉप बॉक्स पोर्टेबिलिटीचा पर्याय खुला होणार आहे. या संदर्भातील नियमावाली टेलिकॉम नियंत्रण प्राधिकरणाने (ट्राय) तयार केली आहे. यामुळे डीटीएच ग्राहकांना सेट टॉप बॉक्ससाठी वेगळे पैसे न मोजता त्यांच्या पसंतीच्या कंपनीची सेवा घेता येणे शक्य होणार आहे.
देशात २००३ मध्ये डीटीएच सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर आजमितीस देशात सहा कंपन्या ही सेवा पुरवितात आणि या कंपन्यांचे सुमारे सात कोटी ३० लाख ग्राहक आहेत. यापकी ज्या ग्राहकांना एका कंपनीची सेवा बंद करून दुसऱ्या कंपनीची सेवा घ्यावयाची आहे अशा ग्राहकांना पुन्हा नवीन कंपनीला सेट टॉप बॉक्सचे पैसे भरावे लागत होते.  यामुळेच ट्रायने या संदर्भात नवी नियमावली तयार केली आहे. या नियमांनुसार ग्राहकांना आहे त्याच सेट टॉप बॉक्सवर नवीन कंपनीची सेवा घेता येणे शक्य होणार आहे. डीटीएच सेवा कंपन्यांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचे ट्रायने नमूद केले आहे. यात ग्राहकांनी केवळ इन्स्टॉलेशन आणि अ‍ॅक्टिवेशनचे पैसे भरावयाचे आहे. याचबरोबर हे दर ४५० रुपयांपेक्षा जास्त नसावेत असेही ट्रायने नियमावलीत नमूद केले आहे. याचबरोबर कंपन्यांनी ग्राहकांसाठी एक प्रमाणित पॅकेज तयार करावे. या पॅकेज व्यतिरिक्त जर कोणत्या ग्राहकाला काही सुविधा हव्या असतील तर त्या त्यांनी अतिरिक्त घ्याव्यात अशी सूचनाही नियमावलीत करण्यात आली आहे. वॉरंटीचा कालावधी संपल्यानंतर ग्राहकांच्या घरी जाऊन काही दुरुस्ती करावयाची असेल तर त्यासाठी आकारण्यात येणारे भेटीचे दर हे २५० रुपयांपेक्षा जास्त नसावे असेही नियमात स्पष्ट करण्यात आले आहे.
केबल ग्राहक सुविधेपासून वंचित
सेट टॉप बॉक्स पोर्टेबिलिटीची सुविधा केबल ग्राहकांनाही मिळावी यासाठी ट्रायतर्फे प्रयत्न सुरू होते. मात्र, विविध केबल चालक वापरत असलेल्या तंत्रज्ञानांमध्ये तफावत असल्यामुळे ही सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नसल्याने सध्या ही सुविधा केवळ डीटीएच ग्राहकांसाठीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. डीटीएच सेवेसाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान हे समान असल्यामुळे ते शक्य होणार आहे.