‘दिल्ली सफारी’ हा अ‍ॅनिमेशनपट, ‘तसेच ‘कल हो ना हो’सारख्या चित्रपटाचा दिग्दर्शक निखिल अडवानी आता मराठी चित्रपट निर्मितीमध्ये उतरणार असून भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्यावर तो चरित्रपट बनविणार आहे. सुबोध भावे लोकमान्य टिळकांची प्रमुख भूमिका साकारणार असून ओम राऊत या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत.
स्वातंत्र्य चळवळीत लोकमान्य टिळकांचे स्थान सर्वोच्च असून त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व पडद्यावर साकारण्याचे आम्ही ठरविले आहे. त्याचबरोबर निर्माता म्हणून मराठी सिनेमाला बॉलिवूड चित्रपटांच्या बरोबरीला आणणे हा उद्देशही आहे. या चित्रपटासाठी लोकमान्य टिळकांचे पणतू दीपक टिळक यांच्याकडून आवश्यक ती परवानगी मिळाली असून १५ मेपासून चित्रीकरण सुरू होणार असल्याचे अडवानी यांनी सांगितले.
बालगंधर्व अप्रतिमपणे साकारणारा सुबोध भावे आता लोकमान्य टिळकांची व्यक्तिरेखा पेलणार हे या चित्रपटाचे खास वैशिष्टय़ आहेच. त्याचबरोबर ‘तिचा बाप त्याचा बाप’ या चित्रपटाचे सहनिर्माते ओम राऊत आता दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत, हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ मराठी धुरिणांनी केली. त्यामुळे भारतीय सिनेमाचे शतसांवत्सरिक वर्ष साजरे होत असताना मराठी चित्रपटाची निर्मिती करणे आणि मराठी धुरिणांच्या योगदानाची दखल घेणे हाही मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यामागचा उद्देश आहे, असेही निखिल अडवानी यांनी सांगितले.
सुप्रसिद्ध संगीतकार त्रिकुट शंकर-एहसान-लॉय हे यानिमित्ताने प्रथमच मराठी चित्रपटाला संगीत देणार आहेत.
बालगंधर्व ही पदवी लोकमान्य टिळकांनीच दिली होती हे सर्वश्रुत आहे. आता बालगंधर्व यांची भूमिका साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता सुबोध भावे यालाच लोकमान्य टिळकांची भूमिका साकारण्याची संधी मिळतेय हा योगायोग या चित्रपटाच्या निमित्ताने होतोय.