सिंचन क्षेत्रातील गैरव्यवहारांपाठोपाठ आता जलसंधारणाच्या कामातील गैरव्यवहारांच्या चौकशीची घोषणा ग्राविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. सिंचन क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या चौकशीमुळे राष्ट्रवादी अडचणीत आली आहे, तर जलसंधारण चौकशीचा इशारा देऊन काँग्रेसला कोंडीत पकडण्याची भाजप सरकारची ही खेळी असल्याचे मानले जात आहे.
सिंचन क्षेत्रातातील घोटाळ्याने महाराष्ट्राचे राजकारण हादरून गेले होते. त्या वेळी विरोधी पक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेने आघाडी सरकारच्या विरोधात त्याचा खुबीने वापर केला. या घोटाळ्याशी संबंधित मंत्र्यांची चौकशी करण्याची घोषणा भाजपने केली होती. त्यानुसार भाजप सरकारने जलसंपदा खात्याची दहा वर्षे जबाबदारी संभाळणारे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खुल्या चौकशीला परवानगी दिली.
राष्ट्रवादीचे दुसरे नेते व माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनाही चौकशीच्या फेऱ्यात अडकवले. जलसंपदा खाते राष्ट्रवादीकडे होते. त्यामुळे सिंचन क्षेत्रातील घोटाळ्याच्या चौकशीमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
मागील आघाडी सरकारमध्ये जलसंधारण हे खाते काँग्रेसकडे होते. त्यावेळी सिंचन क्षेत्रातील गैरव्यवहाराच्या चर्चेला खतपाणी घालत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात मोठय़ा प्रमाणावर जलसंधारणाअंतर्गत सिमेंट बंधारे बांधण्याचा धडाका लावला. मात्र त्याबाबतही तक्रारी यायला सुरुवात झाली.
त्याबद्दल पंकजा मुंडे म्हणाल्या की  जलसंधारणाच्या कामांत अनियमितता आहे. गरज नसताना बंधारे बांधण्यात आले, काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत, आधीच्या सर्व प्रकल्पांच्या कामाची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.