साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी यांच्या औपचारिक वेबसाईटचे अनावरण करण्यात आले आहे. ratnakarmatkari.com नावाने सुरु करण्यात आलेल्या या बेबसाईटवर लेखक म्हणून मागील ६४ वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे मतकरी यांच्या चाहत्यांबरोबर साहित्यप्रेमींसाठी ही वेबसाईट माहितीचा खजिना ठरणार आहे.

मतकरी यांना बालसाहित्यासाठी या वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. मतकरी यांच्या नावाने वेबसाईट अपडेट करायचं अनेक वर्षांपासून चर्चेत होतं. अखेर गणेश मतकरी आणि सुप्रिया विनोद यांनी रत्नाकर मतकरींच्या ८०व्या वाढदिवसानिमित्ताने (१७ नोव्हेम्बर) वेबसाईट प्रसिद्ध करायची असं ठरवलं. त्यानुसार त्यांनी वेबसाईट डिझाईन करायची जबाबदारी सौरभ करंदीकर यांच्या खांद्यावर टाकली. अखेर आता ही वेबसाईट प्रत्यक्षात अपडेटेड स्वरूपात वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

वयाच्या सोळाव्या वर्षापासून आजपर्यंत रत्नाकर मतकरी यांनी १२३ पुस्तके, १५० नाटके, ५३ एकांकिका, २७७ लेख, २३७ कथा, ३ कादंबऱ्या, १ कवितासंग्रह, १ चित्रपट, ८ चित्रमालिका, ३ नाट्यरूपांतरे अशी सखोल आणि वैविध्यपूर्ण साहित्यनिर्मिती केली आहे. आज वयाच्या ८० व्या वर्षीही ते नेहमीच्याच उत्साहाने नवनवीन साहित्यप्रयोग करत आहेत. मतकरी यांची वेबसाईट मला डिझाईन करता आली याचा मला अभिमान असल्याचे मत सौरभ करंदीकर यांनी व्यक्त केले आहे. ज्यांना मतकरी माहित आहेत परंतु त्यांच्या साहित्याबद्दल तसंच त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल पूर्ण माहिती नाही, ज्यांनी मतकरींच्या साहित्यकृती पुस्तकरूपात, नाट्यरूपात अनुभवलेल्या आहेत परंतु इतर कलाविष्कारांबद्दल ते अनभिज्ञ आहेत, तसेच ज्या नवोदितांना मतकरी माहित नाहीत अशा सर्वांसाठी ही वेबसाईट उपयुक्त ठरेल असे करंदीकर यांनी सांगितले.

ही वेबसाईट तयार करतानाचा अनुभव वेबसाईटचे डिझायनर असणाऱ्या सौरभ करंदीकर यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’बरोबर शेअर केला. ‘रत्नाकर मतकरींच्या बालनाट्यात १९८५ ते २००१ पर्यंत मी काम करत होतो. त्यामुळे मतकरी आणि त्यांच्या साहित्याची ओळख माझ्यासाठी जुनी आहे. त्याचा मला ही वेबसाईट बनवताना फायदा झाल्याचे करंदीकर सांगतात. त्याचप्रमाणे मतकरी त्यांच्या साहित्याविषयी, प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाबद्दल सर्व संदर्भ जपून ठेवत असत. त्यांच्या या सवयीमुळे वेबसाईट बनवताना अनेक संदर्भ वापरता आले. आणि या साऱ्या संदर्भांचा खूप फायदा झाला. सध्या ही बेसाईट इंग्रजीमध्ये उपलब्ध करुन देण्याचे काम सुरु असल्याची माहिती करंदिकर यांनी दिली. मतकरी यांचे साहित्य केवळ मराठीच नाही तर गुजराती आणि हिंदीतही अनुवादित करण्यात आले. त्यामुळे इतर भाषिक वाचकांपर्यंत मतकरींचे कार्य पोहचावे म्हणून लवकरच या वेबसाईटचे इंग्रजी स्वरूपही वाचकांच्या भेटीला येणार आहे. मतकरी यांच्या कथा आणि साहित्यातील विविधता आणि वेगळेपण पाहता भविष्यात हॉलिवूडमधील निर्मातेही त्यांच्या कथांवर आधारित निर्मित करु शकतील असे सांगताना याच कारणासाठी इंग्रजीमध्येही त्यांची माहिती उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे करंदीकर यांनी सांगितले. लवकरच या वेबसाईटच्या माध्यमातून मतकरींचे साहित्य कुठे उपलब्ध आहे यासंदर्भातील माहितीही वाचकांना देण्यात येणार आहे.