मुंबईत शनिवारी १,१९९ बाधित आढळले असून, एकूण रुग्णसंख्या एक लाख १७८ इतकी झाली आहे. दिवसभरात ६५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या ५,६४७ वर पोहोचली आहे. मुंबईतील मृत्युदर ५.६ टक्क्य़ांवर कायम आहे, तर ७० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

सध्या २४ हजार ३९ उपचाराधीन रुग्ण असून, शनिवारी १,१५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ७० हजार ४९२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. शनिवारी ६५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी १५ रुग्णांना अन्य कोणतेही आजार नव्हते, तर ४ रुग्णांचे वय ४० च्या आत होते. गेल्या दोन दिवसांत १० ते २० वयोगटातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त मृत्यू अंधेरी, जोगेश्वरी पूर्व भागातील ४१६ इतके आहेत. त्याखालोखाल धारावी, माहीम परिसरातील ४१३ मृत्यू आहेत, तर कुल्र्यातील ३८७ मृत्यू आहेत.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर १.३० टक्क्य़ापर्यंत खाली आलेला असला तरी बोरिवली आणि मुलुंडमध्ये मात्र रुग्ण वाढत आहेत. बोरिवलीत गुरुवारी एका दिवसात १३५ रुग्ण आढळले, तर शुक्रवारी ८४ रुग्णांची नोंद झाली. तर सर्वात कमी रुग्ण मशीद बंदर, उमरखाडी भागात (एका दिवसात ४ रुग्ण) आढळले आहेत.

ठाणे जिल्ह्यात १ हजार ८२२ नवे करोना रुग्ण

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी १ हजार ८२२ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात करोनाची लागण झालेल्या एकुण रुग्णांची संख्या ६५ हजार ९२७ वर पोहोचली आहे. तर, दिवभरात ४३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यु झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा १ हजार ८७० इतका झाला आहे.