मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांच्या ताफ्यामध्ये १५ एप्रिलपासून आणखी एक १५ डब्यांची गाडी येणार असून या गाडीमध्ये महिलांचे सर्व डबे एकाच दिशेने ठेवण्यात येणार आहेत. यामुळे महिलांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेचा ताण कमी होण्यास मदत होईल, असा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये येणाऱ्या नव्या गाडीच्या कल्याण दिशेला पहिले पाच डबे महिलांसाठी असतील. या व्यतिरिक्त महिलांसाठी वेगळा डबा असणार नाही, असे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी स्पष्ट केले. नवी गाडी आल्यावर १५ डब्याच्या सध्या सुरू असलेल्या गाडीतही तशीच व्यवस्था करण्यात येईल. यामुळे आणखी एका महिला विशेष गाडीची आवश्यकता भासणार नाही. महिलांच्या एकत्रित डब्यांची योजना यशस्वी झाली तर १२ डब्यांच्या गाडीतही तशी व्यवस्था करण्यात येईल, असे सांगून जैन म्हणाले की, महिलांचे एकत्रित डबे असले की त्यांच्या डब्यांजवळ ठेवण्यात येणारी सुरक्षा व्यवस्था वेगवेगळी ठेवावी लागणार नाही. तसेच त्यांच्यासाठीची स्वच्छतागृहेही त्या डब्यांजवळ उभारण्यात येतील. ही स्वच्छतागृहे सशुल्क असतील असेही त्यांनी सांगितले.
सायंकाळी चालविण्यात येणारी महिला विशेष गाडी कल्याणच्या पुढे बदलापूपर्यंत नेण्याची महिला प्रवाशांची मागणी असून त्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
तांत्रिक बिघाडामुळे
पश्चिम रेल्वेवर गोंधळ
पश्चिम रेल्वेवरील उपनगरी गाडय़ांमधील तांत्रिक बिघाडामुळे बुधवारी रात्री पश्चिम रेल्वे मार्गावर गोंधळ उडाला. त्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या रात्री आठ वाजून ५३ मिनिटांच्या उपनगरी रेल्वेतील पहिल्या दोन-तीन डब्यांत विजेचा लपंडाव सुरू झाला. सतत लाईट जात असल्याने वैतागून अखेर प्रवाशांनी गाडीची चेन खेचली. त्यामुळे गाडीचा खोळंबा झाला. मुंबई सेंट्रल स्थानकावर अखेर दुरस्तीचे काम करण्यात आले व गाडी पुढे रवाना झाली.
तर दुसऱ्या एका घटनेत बोरिवलीहून चर्चगेटकडे जाणारी गाडी मध्येच रद्द झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. या गाडीत खारनंतर तांत्रिक बिघाड झाला. गाडी कशीबशी माटुंग्यापर्यंत आली. नंतर बिघाडामुळे ती गाडी रद्द करण्यात आली व ती महालक्ष्मी यार्डात पाठवण्यात आली.