मुंबई विद्यापीठात ऑनलाइन एमबीए (ऑनलाइन एक्झिक्युटीव्ह मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ) हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. या संदर्भात गुरुवारी मुंबई विद्यापीठ आणि फेडरल युनिव्हर्सटिी ऑफ ओराल, रशिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेमार्फत हा अभ्यासक्रम राबविला जाणार असून आगामी शैक्षणिक वर्षांपासून अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. विशेषत: ऑनलाइन पद्धतीने हा अभ्यासक्रम राबविला जाणार असून यासाठी एकूण १०४ श्रेयांक विभागून ठेवले जाणार आहेत. या सामंजस्य करारान्वये राबविण्यात येणारा हा पहिलाच अभ्यासक्रम असेल ज्यामध्ये इतर देशांतील विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचे श्रेयांक स्वीकारण्याची मुभा या अभ्यासक्रमात दिली जाणार आहे. हा अभ्यासक्रम संपूर्णत: निवड आधारित श्रेयांक प्रणालीवर आधारित आहे.