ऑक्टोबरमध्ये एकूण चाचण्यांपैकी १४ टक्केच करोनाबाधित

मुंबई : मुंबईत सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढूनही बाधितांचे प्रमाण (पॉझिटीव्हिटी रेट) कमी झाल्याने काहीसे दिलासादायक चित्र आहे. सप्टेंबरमध्ये एकू ण चाचण्यांच्या १७ टक्के  अहवाल बाधित येत होते तर ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण १४ टक्क्यांवर आले आहे. याचबरोबर दर दिवशी केल्या जाणाऱ्या चाचण्यांमधील बाधितांचे प्रमाणही आता कमी झाले आहे. ठाण्यातही चाचण्यांचे प्रमाण वाढले असले तरी रुग्णसंख्या मात्र घटली आहे.

मुंबई महापालिकेने मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. सध्या दर दिवशी १६ ते २० हजार चाचण्यांचे लक्ष्य आहे. दर दिवशी एवढय़ा चाचण्या होत नसल्या तरी आधीच्या तुलनेत चाचण्यांचे प्रमाण नक्कीच वाढले आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत ३,५२,७७० चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ४७,७४८ रुग्णांचे अहवाल बाधित आले. म्हणजेच बाधित असण्याचा दर १३.५३ टक्के  होता. तेच सप्टेंबरमध्ये २,९४,६४९ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ४९,३३४ रुग्ण बाधित आढळले होते. त्यावेळी बाधितांचे प्रमाण १७ टक्के  होते. चाचण्या वाढवल्या असतानाही बाधितांचे प्रमाण कमी झाले हे करोना आटोक्यात येत असल्याचे लक्षण मानले जाते.

आतापर्यंत मुंबईत एकूण १४ लाख ६८ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २,५२,८८८ करोनाबाधित आढळले आहेत. म्हणजेच मुंबईतील बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १७.१७ टक्के  आहे.

प्रतिदिन बाधितही कमी

मुंबईत चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून दर दिवशी आढळणाऱ्या बाधितांची टक्के वारीही घसरली आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत दरदिवशी होणाऱ्या चाचण्यांपैकी २० टक्क्यांहून अधिक अहवाल बाधित येत होते. मात्र ऑक्टोबर महिन्यात हे प्रमाण १० ते १५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार बाधितांचे प्रमाण चाचण्यांच्या पाच टक्क्यांहून कमी असायला हवे. तर भारतात करोनाकाळात दिशादर्शन करणाऱ्या ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) निर्देशांनुसार ते १० टक्क्यांहून कमी असायला हवे.

चाचण्या रुग्ण                बाधितांचे प्रमाण

ऑक्टोबर ३,५२,७७०       ४७,७४८ १३.५३ टक्के

सप्टेंबर  २,९४,६४९         ४९,३३४ १६.७४ टक्के

प्रतिजन चाचणी अधिक

आरटी-पीसीआर चाचण्यांना मर्यादा असल्याने गेले काही दिवस प्रतिजन चाचण्या करण्यावर पालिके चा भर आहे. एकू ण चाचण्यांमध्ये प्रतिजनची संख्या लक्षणीय आहे. प्रतिजनच्या तुलनेत आरटी-पीसीआर अचूक मानली जाते. त्यामुळेही बाधितांचे प्रमाण कमी झाले असावे, असे म्हटले जाते.