डॉ. अमरापूरकर मृत्यू प्रकरणानंतर पालिकेला जाग

बॉम्बे हॉस्पिटलमधील पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा २९ ऑगस्ट रोजी मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या पालिकेने परळ, एल्फिन्स्टन, शिवडी आणि आसपासच्या परिसरातील मॅनहोलची शोधमोहीम हाती घेतली असून तब्बल १८० पालिका कर्मचाऱ्यांची फौज या कामासाठी सज्ज करण्यात आली आहे. पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या, सांडपाणी, मलनि:सारण यासह विविध खासगी सेवा उपयोगिता कंपन्यांच्या मॅनहोलमध्ये एकसमानता असावी या दृष्टीने भविष्यात धोरण आखण्याचा विचार या शोधमोहिमेमागे असल्याचे समजते.

मुंबईमध्ये २९ ऑगस्ट रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसात अनेक रस्ते जलमय झाले आणि तमाम मुंबईकरांना त्याचा फटका बसला. डॉ. दीपक अमरापूरकर त्या दिवशी घरीच पोहोचले नाहीत. त्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू झाली. त्या दिवशी एल्फिन्स्टन जंक्शन परिसरात प्रचंड पाणी साचले होते. पाण्याचा निचरा झाल्यानंतर डॉ. दीपक अमरापूरकर यांची छत्री एल्फिन्स्टन जंक्शन परिसरात सापडली. त्यानंतर काही दिवसांनी वरळी समुद्रकिनाऱ्यावर त्यांचा मृतदेह सापडला. पावसाचे पाणी साचल्यामुळे मॅनहोलची झाकणे काढणारे पाच जण सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बंदिस्त झाले होते. त्यांनाही पोलिसांनी अटक केली होती.

आता पालिकेच्या ‘एफ-दक्षिण’ विभाग कार्यालयाने डॉ. दीपक अमरापूरकर दुर्घटनेनंतर परळ, एल्फिन्स्टन, शिवडी आणि आसपासच्या परिसरातील मॅनहोलचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मॅनहोलची स्थिती काय आहे, मॅनहोलवर झाकणे आहेत की नाहीत, त्यांच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे का या दृष्टीने मॅनहोलची पाहणी करण्याचे काम सुरू झाले आहे. पर्जन्य जलवाहिन्या, सांडपाणी, मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे मुंबईत पसरले असून या वाहिन्यांवर मॅनहोल आहेत. त्याशिवाय बेस्ट, रिलायन्स यांसह १२ सेवा उपयोगिता कंपन्यांची मॅनहोल्स मुंबईत आहेत. काही ठिकाणी मॅनहोलवर झाकणेच नाहीत. काही मॅनहोलवरील झाकणे तुटली आहेत. त्यामुळे पाहणीदरम्यान झाकण नसलेल्या मॅनहोलवर तात्काळ ते बसविण्यात येते. तसेच तुटलेले झाकण बदलण्यात येत आहे. पूर्वी मॅनहोलवरील लोखंडी झाकणे गर्दुल्ले आणि भुरटे चोर चोरत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत पोलिसात तक्रारही करण्यात आली आहे. मात्र अद्याप या प्रकरणी एकालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे मॅनहोलवर लोखंडाऐवजी फायबरची झाकणे बसविण्यास सुरुवात झाली.

परळ, एल्फिन्स्टन, शिवडी आणि आसपासच्या परिसरांतील मॅनहोलची एक आठवडय़ामध्ये तपासणी करून त्याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल पालिका आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. पालिकेच्या विविध विभागांच्या, तसेच अन्य कंपन्यांची मॅनहोल्स आणि त्यावरील झाकणांच्या आकारांमध्ये एकसमानता नाही. काही मॅनहोल गोल आकाराची, तर काही चौकोनी आणि आयाताकृती आहेत.

मॅनहोलच्या आकारांमध्ये एकसंधता येणे गरजेचे आहे. त्यामुळे सुरुवातीला पालिकेच्या सर्व विभागांची मॅनहोल आणि त्यावरील झाकणांचा आकार निश्चित करण्यात येणार आहे.  त्या दृष्टीने पालिकेच्या वरिष्ठ पातळीवर विचार सुरू झाला असून भविष्यात मॅनहोलचा आकार, झाकणे याबाबत धोरण आखण्यात येण्याची शक्यता आहे.

शिक्षेसाठी कायद्याची गरज

मॅनहोलच्या झाकणांची चोरी होत असून ती भंगारवाल्यांना विकण्यात येतात. यापूर्वी मॅनहोलच्या झाकणांच्या चोरीबाबत पोलिसात तक्रार केली होती. परंतु चोर काही पकडले गेले नाहीत. त्यामुळे पालिकेचे नाव, बोधचिन्ह असलेली कोणतीही वस्तू भंगारवाला अथवा पालिकेशी संबंधित नसलेल्या व्यक्तीकडे सापडल्यास त्याला कठोर शिक्षा करणारा कायदा करण्याची गरज आहे. रेल्वेच्या वस्तू चोरणाऱ्यांना अटक केली जाते. तसेच शासन पालिकेच्या मालकीच्या वस्तू चोरणाऱ्यांना करायला हवे, अशी मागणी पालिका अधिकाऱ्यांकडून होऊ लागली आहे.

मॅनहोलवरील झाकणांची चोरी वा ती तुटल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे परळ, एल्फिन्स्टन, शिवडी आणि आसपासच्या परिसरातील मॅनहोलची शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. ही शोधमोहीम आठवडाभरात पूर्ण होईल आणि त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल.

विश्वास मोटे, साहाय्यक आयुक्त, ‘एफ-दक्षिणविभाग