आमदारांच्या अधिकृत सरकारी वाहनांवर चिकटवण्यात येणाऱ्या स्टिकर्सची बाजारात खुलेआम विक्री होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून सरकारकडे या प्रकरणावर कारवाईची मागणी केली आहे.


राणे यांनी म्हटले की, आमदारांचे स्टिकर्स मुंबईतील कुठल्याही बाजारात सहज उपलब्ध होत आहेत. काही अनधिकृत लोक याचा वापर करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे निवडून आलेले लोकप्रतिनिधी यावर आवाज उठवणार नाही तर कोण उठवणार असा सवाल त्यांनी केला आहे. जर अशा प्रकाराकडे दुर्लक्ष केले आणि काही विपरित घडले तर लोक राज्य शासनालाच जबाबदार धरतील त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात आता मी स्वतः वैयक्तिकरित्या लक्ष घालणार असून मी यासंदर्भात एका वरिष्ठ मंत्र्याकडे हा प्रश्न उपस्थित केला आहे. सरकार या प्रकरणी नक्कीच कारवाई करेल असे आश्वासन आपल्याला संबंधीत मत्र्याने दिल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.