गोरेगावातील आंबेडकर नगरमध्ये घराबाहेरील उघड्या गटारात पडून वाहून गेलेला दोन वर्षांच्या दिव्यांश सिंह याचा ३७ तासांनंतर अद्यापही शोध सुरुच आहे. या शोध मोहिमेदरम्यान बचाव पथकाने तब्बल दहा किमी लांबीची ड्रेनेज लाईन तपासली मात्र, त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही.


घटना घडली त्या दिवसापासून अर्थात बुधवारी रात्री उशीरापासून अग्निशामक दल या चिमुकल्याचा शोध घेत आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी रात्री साडे दहाच्या सुमारास दिव्यांश हा खेळताना घराबाहेर आला त्यानंतर परत घराकडे जाताना अंधार असल्याने तो चुकून जवळच्या उघड्या गटारात पडला. दिवसभर या भागात जोरदार पाऊस झाल्याने गटारातून पावसाचे पाणी वेगाने वाहत होते, या पाण्याच्या प्रवाहासोबत तो देखील वाहून गेला असावा, असे उपलब्ध सीसीटीव्हीमधील चित्रीकरणावरुन कळते.

घटना घडली त्याच्या काही वेळातच दिव्यांशची आई त्याला घराबाहेर शोधण्यासाठी आली. मात्र, तिला दिव्यांश सापडला नाही. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर त्यांच्या घराशेजारील एका दुकानाबाहेर बसवलेल्या सीसीटीव्हीतील चित्रीकरण तपासण्यात आले. यामध्ये दिव्यांश उघड्या गटारात पडताना दिसला. त्यानंतर याची पोलिसांना आणि अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली आणि त्याचा शोध सुरु करण्यात आला. मात्र, आता तब्बल ३७ तास उलटले तरीही त्याचा तपास लागू शकलेला नाही.