वादग्रस्त विषयांवर बोलणे टाळावे, आमदारांना सल्ला

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनात सभागृहात विरोधी पक्षाच्या आक्रमणाचा एकजुटीने मुकाबला करण्याची रणनीती महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत ठरविण्यात आली. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय लोकसंख्या सूची (एनपीआर) व इतर वादग्रस्त विषयावर बोलणे टाळावे, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या आमदारांना दिला.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी, सीएए, एनपीआर, एनसीआर, कायदा व सुव्यवस्था आदी मुद्दय़ांवर सत्ताधारी आघाडीला घेरण्याची तयारी विरोधी पक्ष भाजपने केली आहे. सभागृहात विरोधी पक्ष उपस्थित करणाऱ्या प्रश्नांचा मुकाबला कसा करायचा, यावर चर्चा करण्यासाठी विधान भवनात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व आमदारांची बैठक झाली.

बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री जयंत पाटील आदी मंत्री उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी सीएएला पाठिंबा दिल्यामुळे सध्या आघाडीत कुरबुर सुरू आहे. तीन पक्षांचे विचार वेगवेगळे आहेत, परंतु आपण किमान समान कार्यक्रमावर एकत्र आलो आहोत, त्यावरच सरकार चालेल, त्यामुळे इतर वादग्रस्त विषयांवर बोलण्याचे टाळावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याचे समजते. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विरोधी पक्षांना काय टीका करायची ते करू देत, कारण आपण तीन महिने झाले सत्तेवर आलो आहोत, त्यांना  ६० महिन्यांचा हिशेब द्यावा लागणार आहे, असे काही मंत्र्यांनी बैठकीत सांगितले. सीएए, एनपीआर, एनआरसीबाबत काय भूमिका घ्यायची हे ठरविण्यासाठी ज्येष्ठ मंत्र्यांचा समावेश असलेली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

आघाडीच्या सर्व आमदारांनी सभागृहात वेळेवर हजर राहावे, कुणीही गैरहजर राहू नये, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. सभागृहातच आघाडीच्या एकजुटीने विरोधकांचा मुकाबला करण्याची रणनीती ठरविण्यात आली.